सोमवारपासून एसटीची मुंबईतील सेवा होणार बंद! सर्वसामान्य कसा करणार प्रवास?

त्यामुळे आता मुंबईत कामानिमित्त जाण्यासाठी प्रवास कसा करायचा, असा प्रश्न सर्वसामांन्यांना पडला आहे.

राज्यात लागू असलेल्या कडक लॉकडाऊनमुळे मुंबईतील उपनगरीय लोकल सेवा सर्वसामांन्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दररोज कामानिमित्त मुंबईत जाणा-या चाकरमांन्यांची गैरसोय होऊ नये आणि सार्वजनिक वाहतुकीवर अतिरिक्त ताण पडू नये, म्हणून परिवहन मंडळाच्या वतीने मुंबईत बेस्ट सोबतच एसटीची बस सेवा सुरू करण्यात आली होती. पण आता ही सेवा उद्यापासून बंद करण्यात येणार असल्याचे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता मुंबईत कामानिमित्त जाण्यासाठी प्रवास कसा करायचा, असा प्रश्न सर्वसामांन्यांना पडला आहे.

काय आहे अनिल परब यांचे ट्वीट?

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती ट्वीट करत दिली आहे. महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उपनगरीय लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती. याचा सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी बेस्टच्या साथीला एसटी बसेस मुंबईत धावत होत्या. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महामंडळाचे कर्मचारी सेवा देत होते. ही सेवा उद्यापासून थांबवण्यात येत आहे, अशी माहिती अनिल परब यांनी ट्वीट करत दिली आहे.

चालक, वाहकांचे मानले आभार

मुंबईत एसटी बस सेवा देण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने, परगावाहून मुंबईत येऊन एसटीचे चालक आणि वाहक मुंबईकरांना सेवा देत होते. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे अनिल परब यांनी कौतुक करत, त्यांचे आभार मानले आहेत. अशा सेवेमुळेच एसटीचा सन्मान व विश्वास आजही टिकून आहे, अशा शब्दांत त्यांनी एसटी कर्मचा-यांचा गौरव केला आहे.

लोकलबाबतचा निर्णय कधी?

राज्यात तसेच मुंबईत सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, सर्वसामान्य नागरिक आता मुंबई लोकल सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. कामानिमित्त मुंबईत प्रवास करणा-या सामांन्यांसाठी लोकल हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपली लाईफलाईन सुरू होण्याची वाट नागरिक बघत आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी सर्व जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हिटी रेटची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबईतील निर्बंध आणखी शिथिल होऊ शकतात. मात्र हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारने महापालिकेला दिलेला असल्याने, मुंबई महापालिका काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीतील मंत्री लोकलबाबत साकारात्मक असून, लोकल सुरू करावी असे सर्वांचे मत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here