आता एसटी सु्द्धा CNG वर धावणार, महामंडळाचा निर्णय

129

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा फटका केवळ सामान्य माणसालाच नाही तर एसटी महामंडळाला देखील बसला आहे. डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक भार पडत आहे. हा भार कमी करण्यासाठी आता एसटी महामंडळाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. डिझेलवर धावणा-या तब्बल एक हजार एसटी बस आता सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याचे एसटी महामंडळाने ठरवले आहे. यामुळे महामंडळाचा इंधनावर होणारा वाढता खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

वर्षभरात काम पूर्ण

या एक हजार एसटी बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यासाठी एका कंपनीची निवड करण्यात आली असून, येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात ज्या ठिकाणी सीएनजी स्टेशन्स उपलब्ध आहेत त्या जिल्ह्यांमध्ये या सीएनजी बसेस चालवण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने या बसेसच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः एसटीचीही इलेक्ट्रिक वारी! सुरू होणार ‘ई-शिवनेरी’चा प्रवास)

खर्च कमी करण्याचा प्रयत्न

कोरोना काळात एसटी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या महसुलात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे डिझेलवर होणारा खर्च कमी करुन आपल्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करत आहे. त्यामुळेच सीएनजीवर बस चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

140 कोटींचा खर्च

यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एक कंपनी त्यात पात्र ठरली आहे. या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यासाठी 140 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.