एसटीतील कंत्राटी भरतीचा निर्णय तूर्तास स्थगित!

126

गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेला एसटीच्या संपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. त्यामुळेच सरकारने 11 हजार कंत्राटी कार्मचा-यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. पण सध्या न्यायालयाने कर्मचा-यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 22 एप्रिलपर्यंत कंत्राटी पद्धतीने कर्मचा-यांची भरती केली जाणार नसल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

आढावा बैठक घेण्यात आली

22 एप्रिलपर्यंत जे एसटी कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. एसटी पूर्वरत सुरु करण्यासाठी सोमवारी मंत्रालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपस्थित होते.

लवकरच सुरु होणार लालपरी

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर, त्या हल्ल्यात सहभागी असलेल्या एसटी कर्मचा-यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्याबाबतीत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच, सर्वसामान्यांच्या हक्काची एसटी लवकरच सुरु केली जाणार असल्याचे परब यांनी सांगितले.

( हेही वाचा: …तर वाहनचालकांना दर दिवशी होणार ५० रुपये दंड! )

१५० इलेक्ट्रिक बस लवकरच ताफ्यात

राज्याच्या इलेक्ट्रिक धोरणानंतर्गत २०२५ पर्यंत सुमारे ५ हजार ३०० एकूण बसेस आणण्याचा प्रयत्न आहे. त्यापैकी पहिल्या टप्यात १५० बसेस जून ते जुलै दरम्यान एसटीच्या ताफ्यात आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी एका कंपनीशी करार झाल्याची माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.