एसटीला बाप्पा पावला! गणेशोत्सवादरम्यान कमावले ‘इतके’ कोटी

सुरक्षित प्रवास म्हणून चाकरमान्यांनी एसटीवर विश्वास दाखवल्याने अवघ्या काही दिवसांतच जादा गणपती स्पेशल गाड्या फूल झाल्या.

123

गणेशोत्सवानिमित्त कोकणात सोडलेल्या जादा गाड्यांच्या वाहतुकीतून एसटीला तब्बल ७ कोटी ८२ लाख ३२ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान ३ हजार २९० ‘गणपती स्पेशल’ बसेसद्वारे सुमारे ३ लाख ९६ हजार प्रवाशांनी एसटीतून सुखरुप प्रवास केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

प्रवाशांचे मानले आभार

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीवर दाखवलेल्या प्रेमामुळेच कोट्यावधींचे उत्पन्न मिळाले, असे म्हणत त्यांनी प्रवाशांचे आभार मानले. दरम्यान, गणेशोत्सवात प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा प्रदान करणाऱ्या चालक-वाहकांबरोबरच त्यांना साथ देणारे यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकारी यांचेही परब यांनी कौतुक केले आहे.

(हेही वाचाः खासगी बसवाले कापतत चाकरमान्यांचो खिसो)

चाकरमान्यांचा एसटीवर विश्वास

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. ‍किंबहुना एसटी, गणपती व कोकणचे चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटी महामंडळाने चाकरमान्यांसाठी २ हजार २०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सुरक्षित प्रवास म्हणून चाकरमान्यांनी एसटीवर विश्वास दाखवल्याने अवघ्या काही दिवसांतच जादा गणपती स्पेशल गाड्या फूल झाल्या.

एकूण ८ हजार २९९ फे-या

चाकरमान्यांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे एसटीला गणेशोत्सवादरम्यान सुमारे ३ हजार २९० गाड्या सोडाव्या लागल्या. ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या बसेसद्वारे ८ हजार २९९ फेऱ्या पार पडल्या. यामधून एसटीला ७ कोटी ८२ लाख ३२ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले, असे  परब यांनी सांगितले.

(हेही वाचाः एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची ‘या’ महिन्याचीही तारीख हुकणार! )

भविष्यातही एसटी सेवेसाठी तत्पर

यंदा गणेशोत्सवादरम्यान कोणतेही विघ्न न येता जादा वाहतूक सुरळीत पार पडली. एसटी महामंडळाच्या नियोजनबद्ध सेवेमुळे भाविकांना मुंबई, ठाणे, पालघर व आसपासच्या परिसरातून थेट गावापर्यंत सुरक्षित पोहचवण्याचे अभिवचन एसटीने पूर्ण केले आहे. भविष्यातही चाकरमान्यांच्या मदतीला एसटी नेहमीच तत्पर असेल, अशी आशा परब यांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.