पगाराविना एसटी कर्मचा-यांची ‘घर’गाडी रखडली

१५ तारीख उलटून गेली, तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही.

सरकारी काम, सहा महिने थांब… असे अनेकजण म्हणतात, तसा अनुभव देखील बऱ्याचदा येतो. मात्र आता अशीच काहीशी वेळ एसटी कर्मचाऱ्यांवर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार ठरलेल्या तारखेला मिळत नसल्याने, एसटी कर्मचारी संतप्त झाले आहेत. आता पगारासाठी एसटी कर्मचाऱ्यांना आणखी वाट पहावी लागणार आहे. एसटी कर्मचा-यांच्या पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होतो. मात्र मागील काही महिन्यांपासून १५ तारखेनंतरच एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत आहे. या महिन्यात देखील १५ तारीख उलटून गेली, तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही.

जूनचा पगार २३ तारखेला

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेतन वेळेत न मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. जून महिन्यात ७ तारखेला येणारा पगार २३ जून रोजी जमा करण्यात आला. एवढेच नाही तर जून महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी वेतन वेळेत मिळावे यासाठी चक्क महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करत ‘शासनाला सुबुद्धी मिळो आणि पगार लवकरात लवकर होवो’, असे साकडे घातले होते. त्यामुळे या महिन्यात देखील कर्मचाऱ्यांवर हीच वेळ आली आहे.

(हेही वाचाः सेवानिवृत्ती, बदलीनंतरही अधिकारी शासकीय घर सोडेनात! सरकारने घेतला ‘हा’ निर्णय!)

हे आहे कारण

कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, दैनंदिन २२ कोटी उत्पन्न देणाऱ्या आणि ६५ लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एसटी महामंडळाचे पुरते कंबरडे मोडले आहे. कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाहीत. शिवाय शासनाच्या इतर सवलती योजनेचे प्रवासी सुद्धा एसटीने प्रवास करत नसल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. डिझेलचे दर वाढल्याने सध्या होणारे किरकोळ उत्पन्न संपूर्णतः डिझेलवर खर्च होत असल्याने, शिल्लक राहत नसल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून केला जात आहे. अशा परिस्थितीत कामगार करार कायद्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित ७ तारखेला किंवा त्यापूर्वी करण्याच्या सूचना असतानाही वेतन अद्याप मिळाले नसल्याने, एसटी महामंडळातील मान्यता प्राप्त राज्य एसटी कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली असून, वेळेत वेतन देण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचाः एसटीच्या तिजोरीत महापुरामुळे आला ‘दुष्काळात तेरावा’)

गेल्यावर्षी वेतन वेळेवर मिळाले नसल्याने आर्थिक विवंचनेतून दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतरही एसटी महामंडळ प्रशासन आणि राज्य सरकार संवेदनशील दिसत नाही. जीवावर उदार होऊन एसटी कर्मचा-यांनी काम केल्यानंतरही त्यांच्या वाट्याला उपेक्षाच येत आहे. त्यामुळे याविरुद्ध आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे.

-संदीप शिंदे, अद्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here