राज्य परिवहन महामंडळाचे संपावर गेलेले सर्वचे सर्व कामगार उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम मुदतीच्या आत पुन्हा कामावर हजर झाले आहेत. आज २२ एप्रिल रोजी एकूण ८२ हजार २६० कामगार उपस्थितीत झाले होते. मात्र यात बडतर्फ १० हजार २७५ कामगारांना कामावर हजर होण्यासाठी अजून २ ते ४ आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
न्यायालयाची मुदत आणि सदावर्तेंना जामीन योगायोग
संपकरी एसटी कामगारांनी संप मिटवावा आणि २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर दोनच दिवसांत संतप्त एसटी कामगारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला, याप्रकरणी संपकरी एसटी कामगारांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. त्यानंतर एका बाजूला सदावर्ते यांची मुंबईसह सातारा, कोल्हापूर, पुणे येथे रवानगी केल्यानंतर नेमके २२ एप्रिल रोजीच वकील सदावर्ते यांना जामीन देण्यात आला आणि संपकरी कामगारांना कामावर रुजू होण्यासाठीही २२ एप्रिल हीच अंतिम मुदत देण्यात आली होती, हाही योगायोग आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
(हेही वाचा संपकरी एसटी कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या जयश्री पाटील गेल्या कुणीकडे?)
बडतर्फ कामगारांना ४ आठवडे प्रतीक्षा करावी लागणार
दरम्यान २२ एप्रिल रोजी राज्यभरातून एसटीच्या सर्व आगारांमध्ये एकूण उपस्थिती ८२ हजार ३६० होती. आजच्या दिवशी ५ हजार ३९८ कामगार रुजू झाले. मात्र परिवहन महामंडळाने एकूण १० हजार २७५ कामगारांना बडतर्फ केले होते. त्या कामगारांना मात्र अद्याप त्यांना कामावर रुजू करवून घेण्यात आले नाही, त्यांनी अपील केले आहे, त्यांचे अपील विचारार्थी असून त्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अजून २ ते ४ आठवडे लागणार आहेत. त्यामुळे या कामगारांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community