उरले फक्त ५ दिवस, तरी ३५ हजार एसटी कामगार गैरहजर

219
राज्य सरकारी परिवहन महामंडळाच्या संपकरी कामगारांना मुंबई उच्च न्यायालयाने कामावर रुजू होण्यासाठी २२ एप्रिल ही अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र जे कामगार कामावर हजर होणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यास राज्य सरकारला न्यायालयाने पूर्ण मोकळीक दिली आहे. त्यामुळे मागील ४ महिन्यांच्या तुलनेत कामावर हजर होणाऱ्या कामगारांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. मात्र तरीही २२ एप्रिल हा अल्टिमेटम संपायला ५ दिवस उरलेले असताना अद्याप ३५ हजार २२१ कामगार गैरहजर आहेत. त्यामुळे कामावर हजर होण्यासाठी उरलेले दिवस पाहता कामगारांनी आणखी मोठ्या संख्येने कामावर हजर होण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्यात एसटी पूर्ववत होणार 

राज्य सरकारने एसटीच्या विलनीकरणाची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे एसटी कामगारांनी १५ एप्रिल रोजी कामावर हजर राहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी, ६ एप्रिल रोजी दिले होते. मात्र गुरूवारी, ७ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अंतिम निर्णय दिला, न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितले आणि सर्व याचिका निकाली काढल्या. त्याप्रमाणे कामावर रुजू होणाऱ्या कामगारांच्या संख्येत चांगली वाढ होताना दिसत आहे. न्यायालयाच्या अल्टिमेटमला ५ दिवस उरले असताना रविवारी, १७ एप्रिलपर्यंत राज्यभरातील २२१ आगारात ४६ हजार ४६२ कामगार रुजू झाले आहेत. एकूण ८१ हजार ६८३ कामगारांपैकी ३५ हजार २२१ एसटी कामगार अजूनही कामावर हजर झालेले नाहीत. कामावर हजर होण्यासाठी कामगारांनी केलेले अर्ज प्रक्रियेमध्ये असल्याने प्रत्यक्ष कामावर हजर होणाऱ्यांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे २२ एप्रिलपासून राज्यात सर्वदूर एसटी सेवा पूर्ववत होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.