गुढीपाडव्यामुळे एसटी कामगारांवरील कारवाई टळली

89

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी ३१ मार्चनंतरही संप सुरू ठेवला, तर कामगारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. मात्र तरीही कामगारांनी संप सुरूच ठेवल्याने कामगारांवर कारवाई होईल, अशी शक्यता होती, मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी संपकरी कामगारांच्या घरी नाराजीचे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून महामंडळाने संपकरी कामगारांवर तुर्तास कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ५ एप्रिल रोजी एसटी संपाच्या विषयावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तोपर्यंत ही कारवाई होणार नाही, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. १ एप्रिल रोजी राज्यभरातील महामंडळाच्या २५० आगारांमध्ये कामगारांची एकूण उपस्थित ३४ हजार ५८६ होती, तर ४७ हजार ९७ कामगार अजूनही सेवेत रुजू झालेले नाहीत.

कंत्राटी कामगारांची नियुक्ती होणार

या आधीही परिवहन महामंडळाने संपकरी कामगारांवर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र मधल्या काळात राज्य सरकारने ही कारवाई थांबवली होती, परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे कामगार ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू होणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे १ एप्रिल रोजी ४७ हजार ९७ रोजी एसटीचे कामगार संपावर होते, परंतू महामंडळाने कारवाई करणे तुर्तास थांबवले आहे. मात्र आता एसटी पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी महामंडळ १० हजार कामगार कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरु करणार आहे.

(हेही वाचा ताठर भूमिका घेणा-या एसटी कामगारांवर कारवाई अटळ; नवीन भरती करणार)

…तर पुढील आठवड्यात ८ हजार बसगाड्या धावणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्टीमेटम दिल्यानंतर मागील ५ दिवसांत दररोज किमान ३०० ते ५०० कामगार रूजू होत होते. १ एप्रिलपासून एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी शक्यता होती, परंतू तसे झाले नाही. कामगारांच्या हटवादी धोरणामुळे सरकार मात्र ठरवल्याप्रमाणे कडक कारवाई करणार आहे. तसेच सोबत कंत्राटी कामगार भरती सुरू करणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात एसटीच्या ७ ते ८ हजार गाड्या धावतील, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.

(हेही वाचा १ एप्रिलपासून एसटी पूर्ण क्षमतेने धावणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.