वेतन देण्यास विलंब झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना ७ जानेवारी उलटूनही वेतन मिळालेले नाही. वेतन आणि अन्य थकबाकी देण्यासाठी महामंडळाने राज्य शासनाकडे ९५० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
( हेही वाचा : अंधेरीचा गोखले पूल पाडण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! गाड्यांचे वेळापत्रक बदलले)
एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास अडचणी
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप केला होता. त्यानंतर वेतनात वाढ करून या समस्येवर तात्पुरता तोडगा काढण्यात आला. एसटी महामंडळ चार वर्षांमध्ये फायद्यात येईल या अटीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी ही राज्य सरकारने घेतली होती. त्यानुसार दर महिना वेतनासाठी ३६० कोटी मिळू लागले. मात्र जुलै २०२२ पासून शासनाकडून फक्त १०० कोटी रुपये निधी मिळत आहे. हा निधी सुद्धा वेळेत मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास पुन्हा एकदा अडचणी निर्माण झाल्या आहेत.
९५० कोटींची मागणी
डिसेंबर २०२२ चे वेतन एसटी कर्मचाऱ्यांना ७ जानेवारीपर्यंत मिळालेले नाही. यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यांची आर्थिक घडी विस्कटते, यामुळेच वेतन आणि अन्य थकबाकींसाठी एसटी महामंडळाने ९५० कोटींची मागणी शासनाकडे केली आहे.
Join Our WhatsApp Community