एसटीच्या पाच हजारांहून अधिक ई-बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ई-बस निविदा प्रक्रिया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळात पूर्ण झाली आहे. एसटीतील ५ हजार १५० ई-बस बांधणीसाठी ऑलेक्ट्रा कंपनीची निवड करण्यात आली आहे.
एसटीच्या ई-बस बांधणीसाठी दहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. येत्या २४ महिन्यांत सर्व ई-बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होऊन राज्यात धावणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ५ हजार १५० ई-बस ताफ्यात दाखल करण्याच्या सूचना बैठकीत दिलेल्या आहेत. यानुसार महामंडळाकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
(हेही वाचा Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रगीतादरम्यान उभे राहिले नाही; पोलिसांसह 14 जणांना अटक)
एसटीच्या ताफ्यात जीसीसी अर्थात प्रति किमी निश्चित रकमेच्या भाडेतत्वावर ई-बस ताफ्यात दाखल होणार आहेत. यात निविदा सादर करण्यासाठी ८ मे रोजी अंतिम मुदत होती. १० मे रोजी निविदा उघडण्यात आल्या आहेत. यात चार कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ई-बस बांधणीचा दांडगा अनुभव असलेल्या कंपन्यांचा यात समावेश होता. ई-बस एसटीच्या स्वमालकीच्या नसल्याने कोणत्याही प्रकारचे भांडवल गुंतवण्याची एसटीला आवश्यकता नाही. चालक, यांत्रिक, बसची देखभाल, वीज खर्च आणि चार्जिंग स्टेशन या सर्व बाबींची पूर्तता कंत्राटदार करणार आहे. ई-शिवनेरी आणि ई-शिवाईला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत असतानाच ई-बसचा मोठा ताफा एसटी महामंडळात समावेश करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पडले आहे.
५,५८० ई-बससाठी निविदा
केंद्राच्या फेम-२ योजनेंतर्गत दिल्ली, बेंगळुरू, सूरत, कोलकाता आणि हैद्रराबाद या पाच शहरांसाठी ५ हजार ५८० ई-बससाठी कन्व्हर्जन्स एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या क्रमांकाची निविदा आहे. दुसऱ्या क्रमांकाची निविदा एसटीची आहे, असा दावा महामंडळाचा आहे.
Join Our WhatsApp Community