एसटीकडे उरला फक्त ‘इतकाच’ मदत निधी! कशी देणार अपघातग्रस्तांना भरपाई?

आता एसटीकडे निधीच नसल्याने इतर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना भरपाई कशी मिळणार, असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

78

लालपरी अशी ओळख अलेलेली एसटी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक तोट्यात असल्याचे आपण वारंवार वाचत आलो आहोत. मात्र कोरोना काळातही कर्तव्य बजावलेल्या आणि कोरोनामध्ये मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना मदत देण्यासाठी महामंडळाकडे आता पैसे उरले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार एसटीकडे जमा केलेल्या मदत निधीपैकी आता फक्त ३५ कोटी इतकाच निधी शिल्लक राहिला आहे. एसटीचे अपघात किंवा अन्य दुर्घटना घडत असतात, त्यातील प्रवासी आणि इतरांना मदत देण्यासाठी प्रत्येक तिकीटामागे एक रुपया आकारुन, त्यातून आपत्कालीन मदतीचा निधी उभारण्यात आला. तीन वर्षे ही योजना सुरू आहे. गेल्या वर्षी करोनामुळे एसटीचे मोठे उत्पन्न बुडाले. तर २०१९मध्ये त्यानंतरही अपघात व अन्य कारणांसाठी भरपाई देताना हा निधी बराच खर्च झाला. त्यामुळे सध्या फक्त ३५ कोटी रुपये निधी शिल्लक असून एसटीला फारसे उत्पन्न मिळत नसल्याने, त्यात वाढ होत नसल्याची माहिती मिळत आहे.

वारसांना मदत कुठून मिळणार?

राज्यात लॉकडाऊनमध्ये सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा फटका बसला आहे. आतापर्यंत एकूण 5 हजार 999 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना झाला असून, जवळपास 147 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, मृत कर्मचाऱ्यांपैकी ११ जणांच्या वारसांना भरपाई देण्यात आली आहे. आता एसटीकडे निधीच नसल्याने इतर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना भरपाई कशी मिळणार, असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

(हेही वाचाः आता लालपरीचे कर्मचारी पुरवणार महाराष्ट्राला ‘ऑक्सिजन’! कसा? वाचा…)

राज्य आपत्ती निवारण विभागाकडे पाठवणार प्रस्ताव

एसटीकडे निधीची चणचण असल्याने आता मृतांच्या वारसांना भरपाई देण्यासाठी, राज्य आपत्ती निवारण विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. एसटीकडून हा प्रस्ताव येत्या एक ते दोन दिवसांत विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जर राज्य आपत्ती विभागाने निधी दिला, तर मृतांच्या वारसांना मदत मिळू शकते.

‘फ्रंट लाइन वॉरियर’च्या यादीत समावेश कधी करणार

आपले घरदार, गाव सोडून मुंबईत येऊन एसटीचे कर्मचारी सेवा देत आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना देखील झाला होता. मात्र याची दखल ना सरकारने घेतली, ना एसटी प्रशासनाने. विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने घोषित केल्यानंतर ‘फ्रंट लाइन वॉरियर’च्या यादीत प्रत्यक्षात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर त्यात पोलिस विभाग आणि महसूल विभागाचाही समावेश करण्यात आला. मात्र, या यादीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचा ‘फ्रंट लाइन वॉरियर’च्या यादीत समावेश कधी करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

(हेही वाचाः आधीच वेतनाची बोंब आता ​लसही मिळेना! राज्यात ‘लालपरी’ दुर्लक्षित)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.