आषाढी एकादशीनिमित १० जुलै रोजी पंढरपूर यात्रा आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना विशेष सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातून पंढरपूर वारीसाठी ९२ विशेष बसेस सोडल्या जाणार आहेत. ५ ते १४ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील आठ आगारांमधून लालपरी धावणार आहे. पंढरपूर वारीचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे.
एसटी महामंडळाच्या विशेष बसेस
पंढरपूरची यात्रा म्हणजे विठोबाच्या भक्तांची मांदियाळी. आषाढ महिना जवळ आला की, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ भक्तांना लागते. बहुतांश भक्तजन एसटी महामंडळाच्या बसनेही पंढरपुरी पोहोचतात. आषाढी यात्रेमध्ये एसटी महामंडळाला कोट्यवधींचे आर्थिक उत्पन्न मिळत असते. गेल्या दोन वर्षात पंढरपूरची यात्रा झाली नाही. यात महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. २०१९ मध्ये वारीसाठी सोडलेल्या बसद्वारे ४ लाख २३ हजार २२९ रुपयाचे उत्पन्न मिळाले होते. आता कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाल्याने शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल केले असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे यंदा १० जुलै रोजी पंढरपूर यात्रा होत आहे. सर्वसामान्य जनतेला पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसची सोय केली आहे.
( हेही वाचा : अग्निपथ योजनेअंतर्गत लष्करात भरती प्रक्रियेची तारीख जाहीर! जाणून घ्या अटी व नियम)
ज्या गावातून ४४ जण पंढरपूर यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असतील, अशा भक्तांना एसटी महामंडळाने स्वतंत्र बस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील भक्तानी महामंडळाच्या आगारप्रमुखांशी संपर्क साधून बस बुक केल्यास गावातूनच जाण्या-येण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
दोन वर्षानंतर आषाढी वारीपूर्ववत झाली आहे. आठ आगारामधून वारीसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महामंडळात नियोजन केले आहे. भाविकांनी महामंडळाच्या बसने प्रवास करून वारी करावी. – श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक