महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) अधिकारी आणि रेड बस या खासगी तिकीट आरक्षण करणाऱ्या कंपनीशी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्नही उपस्थित झाला होता. या प्रकरणी आता नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
विधीमंडळात आलेला विषय
विधानसभा सदस्यांनी तृतीय (पावसाळी) अधिवेशन- २०२४ कालावधीमध्ये महाराष्ट्र विधानसभा नियम-१०५ अन्वये लक्षवेधी क्र.१७८०, रा.प. महामंडळात (MSRTC) एमटीओआरएस योजनेच्या माध्यमातून रेडबस ऑपरेटरने एसटीच्या अधिकाऱ्यांबरोबर संगनमत करून महामंडळाचे करोडो रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याविषयी एक लक्षवेधी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात आली होती. यात एस.टी महामंडळात (MSRTC) इंद्रधनू योजनेच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे, असे महामंडळाने उत्तर दिले.
त्यानुसार २ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने महामंडळाला संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती सादर करावी. तसेच त्याअनुषंगाने काय कार्यवाही करण्यात आली, त्याबाबत माहिती सादर करावी आणि सदर दोन्ही प्रकरणांचे संपूर्ण कागदपत्रे शासनास तात्काळ सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार बुधवार, ७ ऑगस्ट रोजी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. या घोटाळ्याच्या प्रकरणी महामंडळाच्या (MSRTC) दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून गुरुवार, ८ ऑगस्ट रोजी रेड बस ऑपरेटरना नागपाडा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, अशीही माहिती आहे.
Join Our WhatsApp Community