राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप संपुष्टात आला. पुणे विभागात शुक्रवारी ४ हजार १६५ कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी लावली. त्यामुळे शहरी भागांसह ग्रामीण भागातही एसटीने (ST) वाट धरली आहे. एकाच दिवशी पुणे विभागाच्या ६४० बस रस्त्यांवर धावल्या. अजूनही सुमारे दीडशे बसची दुरुस्ती विविध डेपो व विभागीय कार्यशाळांत सुरू आहे. दुरुस्ती पूर्ण होताच त्या देखील प्रवाशांच्या सेवेत धावतील. मुंबई उच्च न्यायालयाने २२ एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यास सांगितले होते. त्यानुसार शेवटच्या दिवसापर्यंत कर्मचारी हजर होत राहिले.
५ मेपर्यंत वाट पाहावी लागणार
पुणे विभागाच्या एकूण ४ हजार १९५ कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार १६५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यात १ हजार ४८१ चालक तर १ हजार ३८५ वाहक आहेत. केवळ ३० कर्मचारी कामावर येणे शिल्लक राहिले आहेत. ६४० बसच्या माध्यमातून एसटी आपला ‘टॉप’ गियर टाकून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, त्याला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू होण्यास ५ मेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. पहिल्या दिवशी पुणे विभागाच्या ६४० बसने विविध मार्गांवर २ हजार १०० फेऱ्या केल्या. यातून २५ हजार किलोमीटरचा प्रवास केला. ८० हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने पहिल्या दिवशी ८५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.
( हेही वाचा: पोलिसांना फोन आला अन् एफआयआरमधील गंभीर कलमे रद्द केली! मोहित कंबोज यांचा आरोप )
Join Our WhatsApp Community