होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त अतिरिक्त २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मार्च ते १२ मार्च २०२३ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. दरम्यान, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
( हेही वाचा : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का! दिग्गज खेळाडू निवृत्त)
गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणात आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
आरक्षण कुठे कराल?
आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच Msrtc Mobile Reservation App याचाही प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community