राज्यातील सरकार बदलताच एसटीतील दोन बड्या अधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर एसटी महामंडळातील दोन वरिष्ठ अधिका-यांनी नोकरीचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये एसटी महामंडळ कर्मचारी व औद्योगिक संख्या विभागाचे महाव्यवस्थापक माधव काळे आणि अभियांत्रिकी खात्यातील मुख्य अभियंता अनंत खैरमोडे या बड्या अधिका-यांचा समावेश आहे.

माधव काळे यांना प्रतिनियुक्तीवर महामंडळात आणले गेले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यामुळे भविष्यात चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरु आहे.

करार वाढवण्यात आला

राज्यात ठाकरे सरकारमध्ये तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्य परिवहन महामंडळांतर्गत विवक्षित सेवा/ कामासाठी महाव्यवस्थापक या रिक्तपदी माधव काळे यांची नियुक्ती केली. यापूर्वी फडणवीस यांच्या काळात काळे यांची दोन वर्षांच्या करारावर नियुक्ती करण्यात आली होती. करार संपुष्टात आल्यावर तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी करार वाढवला होता.

( हेही वाचा: उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना कॉल; इगो संपल्यामुळे की इगो वाढल्यामुळे? )

काळे यांच्यावरील आरोप

तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात 2016 मध्ये माधव काळे यांना प्रतिनियुक्तीवर एसटी महामंडळात घेतले गेले. या कालावधीत चालक-वाहक पदभरती, ब्रिक्स कंपनीला दिलेले स्वच्छतेचे कंत्राट, रोल्टा कंपनीच्या कंत्राटामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी काळे यांच्यावर केला होता. सक्षम अधिकारी महामंडळात असताना, काळेंना आणण्याचा अट्टाहास का, असा प्रश्नसुद्धा एसटी कर्मचा-यांमधून विचारला जात होता, मात्र तरीही माधव काळे यांना मुदतवाढ देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here