एसटी कर्मचा-यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विलीनीकरण शक्य नसल्याचे, सरकारकडून सांगण्यात आले आहे. मागच्या दोन वर्षांत जवळजवळ 42 कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. कमी वेतन व अन्य आर्थिक समस्यांमुळे मार्च 2020 पासून ते आतापर्यंत अनेक एसटी कर्माचा-यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. संपकाळात एसटी कर्माचा-यांच्या आत्महत्यांमध्ये आणखी वाढ झाली आहे.
…म्हणून टोकाचे पाऊल
एसटीच्या कर्माचा-यांना आत्महत्येचा मार्ग निवडावा लागला, कारण वेतन वेळेवर होत नव्हते. कमी वेतन आणि अन्य आर्थिक समस्या तसेच, कोरोना काळात एसटी धावत नव्हत्या परिणामी, एसटीचे प्रचंड नुकसान झाले. निर्माण झालेल्या या आर्थिक अडचणीचा परिणाम कर्मचा-यांच्या वेतनावर झाला. टाळेबंदी संपल्यानंतरही प्रवासी एसटीकडे वळले नाहीत. त्यामुळे एसटीचा आर्थिक डोलारा कोलमडला. वेतन वेळेवर होत नसल्याने, मानसिक तणावाखाली आलेल्या कर्माचा-यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. संपकाळात तर या आत्महत्यांमध्ये अधिक वाढ झाली.
चालकांच्या आत्महत्या सर्वाधिक
मार्च 2020 पासून ते फेब्रुवारी 2021 पर्यंत 12 कर्मचारी आणि मार्च 2021 पासून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत 11 एसटी कर्माचा-यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत आणखी 19 कर्मचा-यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत एकूण 42 कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणा-यांमध्ये कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, लातूर विभाग, नांदेड, यवतमाळ यासह अन्य एसटी विभागातील कर्मचा-यांचा समावेश असून, त्यामध्ये चालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
( हेही वाचा: मध्य रेल्वेच्या प्रवासी गाड्यांमध्ये आता ५ मिनिटांत भरले जाणार पाणी! )
52 हजार कर्मचारी अद्यापही संपात
सध्या एसटीच्या हजेरीपटावरील कर्मचा-यांची संख्या 81 हजार 683 आहे. यातील 29 हजार 354 कर्मचारीच हजर असून 52 हजार329 कर्मचारी प्रत्यक्ष संपात सामील आहेत. यामध्ये 24 हजार 254 चालक आणि 19 हजार 557 वाहकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 5 हजार 49 चालक आणि 5 हजार 113 वाहक कामावर आहेत.
Join Our WhatsApp Community