एसटीची तिकीट यंत्रणा डिजिटल करण्यात आली आहे. त्यामुळे जुने तिकीट आता वापरात नाही. मात्र, कोरोना आणि संप यानंतर आता एप्रिल महिन्यात राज्यभरात तब्बल 54 टक्के ईटीआय तिकीट मशीन नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे. आता एसटीच्या फे-या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना तिकीट देण्यात समस्या येत आहेत. आता यावर तोडगा म्हणून जुनी तिकीट यंत्रणा वापरली जात आहे. पण, नवीन कर्मचा-यांना जुनी तिकीट यंत्रणा समजत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुले तिकीट देताना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.
तिकीट यंत्रणेवर प्रचंड परिणाम
धुळे, जळगाव, रायगड, ठाणे, सोलापूर, लातूर, नाशिक या विभागात नादुरुस्त ईटीआय मशीनची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात एकूण 38 हजार 534 ईटीआय मशीन देण्यात आल्या आहेत. त्यापैकी तब्बल 20 हजार 962 मशीन नादुरुस्त आणि बंद आहेत, तर फक्त 17 हजार 572 मशीन सुरु असल्याची माहिती एसटी महामंडळ प्रशासनाने दिली. त्यामुळे तिकीट यंत्रणेवर प्रचंड परिणाम झाल्याचे, एका एसटी महामंडळातील अधिका-याने सांगितले.
( हेही वाचा: प्लॅटफाॅर्म तिकीट झाले 50 रुपये )
लवकरच महामंडळ प्रशासनाकडून निविदा
सध्या महामंडळ ईटीआय मशीनपुरवठा व दुरुस्तीचे काम ट्रायमॅक्स कंपनी करत आहे. मात्र, आता एसटी महामंडळ प्रशासनाकडून निविदा नवीन कंपनीला हे कंत्राट मिळते की पुन्हा ट्रायमॅक्स कंपनीलाच काम दिले जाते, ते लवकरच स्पष्ट होईल.