लालपरीतून आरामदायी प्रवास! प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत चांगल्या सुविधा देण्यासाठी पंचसूत्री

94

प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळ विशेष प्रयत्न करत आहे. एसटी महामंडळाची रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ असेल, याबरोबरच प्रत्येक बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ व निर्जंतुक असतील, यावर भर दिला जाणार आहे.

( हेही वाचा : रोहित-राहुल पर्व संपणार? बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…)

एसटी महामंडळाच्या ३०२ व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रवासी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाने बसेसची स्वच्छता, बसस्थानके टापटीप ठेवणे तसेच स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बसेस, बसस्थानक व परिसर तसेच प्रसाधनगृहे स्वच्छ व टापटीप ठेवण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

बसेसच्या स्वच्छतेबाबत पंचसूत्री

१.बसेसची अंतर्बाह्य संपूर्ण स्वच्छता
२.बसच्या खिडक्या सरकत्या व पारदर्शक ठेवणे, खराब खिडक्या त्वरित बदलून घेणे
३. गळक्या बसेस मार्गस्थ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
४. बसमधील आसने सुस्थितीत असतील याची दक्षता घ्यावी, तसेच फाटलेल्या सीट तातडीने दुरुस्ती करून घ्याव्यात.
५. बसचा अंतर बाह्य रंग उडाला असल्यास रंगरंगोटी करून घ्यावी.

बसेस, बसस्थानक व परिसर, प्रसाधनगृहे स्वच्छ करण्याची जबाबदारी एसटीच्या स्वच्छतेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची असली तरी बसमध्ये व बसस्थानकावर स्वच्छता राखणे, इतरत्र कचरा न टाकणे यासाठी वापरकर्त्या प्रवाशांमध्ये जनजागृती करणे तितकेच महत्त्वाचे आहे. याकरिता स्वच्छतादूत नेमून त्यांच्यामार्फत प्रवासी जनतेचे स्वच्छतेबाबत प्रबोधन करणे व त्यांचा सकारात्मक सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी महामंडळाने भित्तिपत्रके, सुभाषिते, उद्घोषणा यांचा प्रभावी वापर करून एसटी कर्मचारी व प्रवासी यांच्यामध्ये स्वच्छतेबाबत जागृती घडवून आणण्याचा संकल्प केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.