कोविडमुळे मृ्त्यू झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबाला एसटीचा दिलासा! अशी करणार मदत

117

एसटी महामंडळाला १ जून २०२१ रोजी ७३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोविडमुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचा-यांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळाने दिलासा दिला आहे. या एसटी कर्मचा-यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीबरोबरच, वारसांना एसटी मध्ये नोकरी देण्याची घोषणा, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.

अशी मिळणार मदत

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा परब यांनी केली. त्याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये देण्याची सरकारी योजनेची मुदत, एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच निकषांनुसार कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना नोकरी देण्यात येईल, असेही एसटीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जाहीर केले आहे.

(हेही वाचाः जाचक अटींमुळे मृत एसटी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचे हाल)

st

एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार

कोरोनातील निर्बंधामुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसला असून, महामंडळाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. पण महामंडळासमोर कितीही अडचणी आल्या, तरी एकाही कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागणार नाही, अशा शब्दांत परब यांनी कामगारांना आश्वस्त केले. सध्या एसटी प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत असली, तरी येत्या काही वर्षांमध्ये एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना हाती घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

 

श्रद्धांजली अर्पण

ग्रामीण तसेच शहरी भागातील चाकरमान्यांच्या हृदयात कायम स्थान असलेल्या एसटीचा मंगळवारी, १ जून २०२१ रोजी ७३वा वर्धापन दिन पार पडला. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले कोरोनाचे संकट पाहता, यंदाही एसटीचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या महामारीत एसटी महामंडळाच्या कोरोना योद्ध्यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या कर्मचाऱ्यांना अनिल परब यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

(हेही वाचाः लालपरीची अशीही कामगिरी, माल वाहतुकीतून झाली ‘कोट्याधीश’!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.