एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत असले, तरी हे नुकसान कर्तव्यावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी स्पष्टोक्ती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
कामावर रुजू होणा-या कामगारांच्या वेतनातून वसुली नाही
एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिककाळ सुरु असलेल्या या संपामुळे महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचारधीन आहे, असे वृत्त प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. वास्तविक अशा प्रकरणी संपामुळे होणारी महसुली नुकसान भरपाई कामगिरीवर रुजू झालेल्या कामगारांच्या वेतनातून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही किंवा तसा प्रस्तावही विचारधीन नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. तसेच अशा तथ्यहीन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान संपामुळे सर्वसामन्य प्रवासी, ज्येष्ठ नागरीकांचे तसेच शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कामगारांनी आपल्या कर्तव्यावर हजर व्हावे, असे आवाहनही चन्ने यांनी केले.
(हेही वाचा “छत्रपतींचा भगवा काहीजण नुसता मिरवताय पण भगव्याची जबाबदारी भाजपची”)
Join Our WhatsApp Community