राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कामगारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीत सदावर्ते यांनी १ लाख कामगारांकडून जवळपास २ कोटीहून अधिक रक्कम जमा केल्याचे समोर आले. त्यातील ८० लाख रुपये सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याकडे आहेत, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गिरगाव न्यायालयात सांगितले. त्याआधारे पोलिसांनी जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जयश्री पाटलांचे पुढे काय होणार?
जयश्री पाटील यांच्याविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय दंडवते यांच्या रिमांड कॉपीमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, शरद पवार यांच्या घरावर हल्ला होण्यापूर्वी वकील सदावर्ते यांच्या परेल टीटी येथील क्रिस्टल टॉवर येथील गच्चीवर बैठक झाली, त्या बैठकीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जयश्री पाटील याही दिसत आहेत. या रिमांड कॉपीमध्ये वकील सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी संपकरी कामगारांकडून २ कोटीहून अधिक रकम जमा केली, मात्र त्याची कुठलीही लेखी पावती दिली नाही. त्याचा हिशेबही देण्यात आला नाही, असे म्हटले आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनीही ही बाब गिरगाव न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. त्यामुळे या रिमांड कॉपीमध्ये जयश्री पाटील सध्या पोलिसांची पाहिजे आरोपी आहेत. त्या कुठे आहेत पोलिसांना सापडत नाहीत. पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी पथक तयार केले आहे. हे पथक सध्या त्यांचा शोध घेत आहे. पोलिसांना त्या सापडल्या नाही तर न्यायालयात त्यांना फरार घोषित करू शकतात, त्यानंतर त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात येईल, पोलिसांच्या तपासात त्यांनी कामगारांकडून २ कोटी जमा केले आहेत. यामुळे कदाचित न्यायालय या काळात त्यांनी कोणती मालमत्ता खरेदी केली आहे का, ते याच पैशातून केली आहे का, हे तपासले जाईल त्याकरता ती मालमत्ता जप्तही केली जाऊ शकते. या दरम्यान जयश्री पाटील स्वतः शरण येऊ शकतात किंवा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करू शकतात, असे कायदेतज्ज्ञ म्हणत आहेत.
Join Our WhatsApp Community