एसटी कर्मचा-याच्या मृत्यूला जबाबदार कोण?

एसटी कर्मचा-यांच्या वेतनाला वाट सापडत नसल्याने एसटी कर्मचारी त्रस्त झाले आहेत. ऑगस्ट महिना उजाडला तरी कर्मचा-यांना अजून त्यांचे जुलैचे वेतन मिळालेले नाही. यामुळे साक्री आगारातील एका एसटी कर्मचा-याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

काय आहे आत्महत्येचे कारण

२७ ऑगस्ट रोजी साक्री आगारात अतंत्य दुर्दैवी घटना घडली असून, साक्री आगारातील चालक कमलेश बेडसे यांनी शुक्रवारी एसटी कर्मचा-यावर आलेल्या दारिद्र्यापोटी व अत्यंत कमी पगारापोटी, तसेच कर्जाच्या ओझ्यामुळे रोज जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागत असल्याने आत्महत्या केली आहे. या निर्दयी प्रशासनामुळे व निष्काळजी सरकारच्या बेजबाबदारपणा मुळे या चालकाने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार अनियमित पगार, एसटीचा तुटपुंजा पगार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः एसटी कर्मचा-यांच्या पगाराची ‘वाट’ खडतर… कधी होणार पगार?)

एसटी कर्मचा-यांची मागणी

या चालकाच्या पश्चात त्याच्या संसाराची जबाबदार ही राज्य सरकार व एसटी प्रशासनाने तात्काळ घ्यावी, अशी मागणी आता कर्मचा-यांकडून जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे संपूर्ण साक्री आगार व धुळे विभागातील कर्मचांर्यामध्ये तीव्र आक्रोश उसळला असून सदर चालकाचे प्रेतही हातात घेण्यास त्यांचे नातेवाईक तयार नाहीत.

सरकार आणि महामंडळावर गुन्हा दाखल करा

सरकारने वेतनासाठी वेळेवर निधी दिला असता तर ही घटना कदाचित टाळता आली असती. तात्काळ वेतन मिळाले नाही तर अशा घटनांची व्याप्ती वाढू शकते. कारण वेतन कमी मिळत असल्याने बहुतांशी कर्मचारी टेन्शनमध्ये आहेत, कर्जबाजारी झाले आहेत त्यातून या घटना घडत आहेत. या घटनेमध्ये महामंडळाचे संबंधित अधिकारी व शासनातील संबंधित या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

(हेही वाचाः डिझेलसाठी पैसे नाहीत म्हणून एसटीने घेतला मोठा निर्णय)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here