अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला!

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आला.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन रखडले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. अखेर काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात सरकारला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री अजित पाटील यांनी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५०० कोटी रुपये दिले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो. वेतन प्रधान अधिनियम कायद्याचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आम्ही न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने वेतन ३ सप्टेंबरआधी देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार वेतन दिले. मात्र कोरोना काळात ३०५ कामगारांनी प्राण दिले. त्यांना वेतनासाठी भीक मागावी लागली, आत्महत्या करावी लागली. यापुढील वेतनही वेळेत व्हावे तसेच प्रलंबित भत्तेही मिळावेत.
संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत झाली. पगारापासून वंचित असलेल्या एसटी कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळाला.

(हेही वाचा : एसटी कर्मचा-यांना मोठा दिलासा… लवकरच वेतन मिळणार)

अजित पवारांनी दिले होते निर्देश

चालू आर्थिक वर्षासाठी १ हजार ४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून, उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला आहे.

जुलै महिन्याचा पगार आता जमा झाला असून, गणपती जवळ आला आहे, त्यामुळे ऑगस्टचा पगार देखील लवकरच जमा होईल, अशी आशा आहे.
श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एस.टी. कर्मचारी काँग्रेस

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी समिती

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here