एसटी कर्मचा-यांचा ‘या’ तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.

119

गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोना काळात प्रामाणिकपणे सेवा देऊनही कर्मचा-यांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळत नसल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. तोट्यात असणा-या एसटी महामंडळाचा परिणाम कर्मचा-यांच्या वेतनावर होत आहे.

यावर तोडगा काढण्यासाठी आपल्या एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी कर्मचा-यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास, येत्या 27 ऑक्टोबर पासून एसटी कर्मचारी संघटनांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

(हेही वाचाः एसटी कर्मचा-यांच्या वेतनासाठी ‘हा’ तात्पुरता उपाय निवडा- श्रीरंग बरगे)

एसटी कर्मचा-यांचे वेतन प्रलंबित

कोरोना काळात एसटी कर्मचा-यांनी प्रामाणिकपणे सेवा दिली. कोरोनामुळे आज 360 एसटी कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. परंतु एसटी कर्मचा-यांच्या मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली की त्यांना कारणं सांगितली जातात. एसटी कर्मचा-यांचा महागाई भत्ता प्रलंबित आहे. दिवाळी तोंडावर आली असताना सुद्धा एसटी कर्मचा-यांचे वेतन अनियमित होत आहे. त्यामुळे कर्मचा-यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास, राज्यातील सर्व एसटी कर्मचारी 27 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करतील, असे संदीप शिंदे यांनी सांगितले.

विधीमंडळावर काढणार धडक मोर्चा

या उपोषणामध्ये एसटी कर्मचा-यांचा घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतनवाढीचा दर आणि इतर मागण्यांची पूर्तता न झाल्यास 27 ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण करण्यात येईल. तसेच एसटी महामंडळाचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या किंवा तिस-या दिवशी कर्मचा-यांकडून विधीमंडळावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, असे शिंदे म्हणाले.

संघर्ष अटळ आहे

एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीत बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले. एसटी कर्मचा-यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठीचा संग्राम आता सुरू झाला आहे. त्यामुळे सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशाराही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.