एमटीडीसीच्या रूम्स आता मेक माय ट्रीप, स्काय-हायवरून बुक करता येणार

134

एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकींग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकींग सुविधा उपलब्ध होण्यासाठी मेक माय ट्रीप आणि गोआयबीबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे आता एमटीडीसीची पर्यटन संकुले ही संकेतस्थळे वापरुन बूक करता येणार आहेत.

महाराष्ट्रात स्काय डायव्हींग साहसी क्रीडा प्रकार सुरू करण्याच्या दृष्टीने स्काय-हाय सोबत सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटन वैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गड-किल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून, हे जगाभरापर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

(हेही वाचाः खासगी बसवाले कापतत चाकरमान्यांचो खिसो)

मुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ

एमटीडीसीने जलद आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुधारित बुकींग इंजिन तसेच राज्यातील पर्यटनस्थळांच्या तपशीलवार माहितीसह नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे. तसेच सिंहगड (जि. पुणे) येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) येथे बोट क्लब सुरू करण्यात येत असून, या तिन्ही उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

राज्यात पर्यटनाच्या अमोघ संधी

कोरोनामुळे सध्या पर्यटनावर बंधने असली तरी विविध धोरणे ठरवणे आणि पर्यटनस्थळाच्या पायाभूत सुविधा-सेवांमध्ये वाढ करण्याबरोबर राज्याच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन विभाग घेत असलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. आपल्याकडचे पर्यटन वैभव जगासमोर नेणे आणि त्यात नवनवीन पर्यटनस्थळांची, नवनवीन बाबींची भर टाकणे गरजेचे आहे. मुंबई हे पर्यटन वैविध्याने नटलेले शहर आहे. येथे समुद्रकिनारा, वन्यजीवन, प्राचीन मंदिरे-गुंफा आणि किल्ले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे जंगल, तर फ्लेमिंगो अभयारण्य देखील आहे. या सर्वांच्या सोबतीला आधुनिकतेची जोड आहे. आता मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय सुरू करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर आपण फक्त विठोबाचे दर्शन घेतो. पण हे मंदीर सुद्धा पाहण्यासारखे असून तिथल्या खांबांवर नक्षीकाम आहे, विविध पौराणिक प्रसंग त्यावर कोरण्यात आले आहेत. लोणार परिसरातील मंदीरेही अशाच पद्धतीने ऐतिहासिक आणि आप्रतिम आहेत. ॲमस्टरडॅमच्या टुलीप गार्डनच्या धर्तीवर आपल्याला सातारा जिल्ह्यातील कास पठारावर फुलांचे पर्यटन करता येईल, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः जगातली सगळ्यात महागडी कॉफी बनते ‘या’ प्राण्याच्या विष्ठेपासून! कशी? वाचा…)

सेवा-सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात

एमटीडीसीने त्यांच्या पर्यटक निवासांच्या नूतनीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. जगभरातील कोणताही पर्यटक जेव्हा बुकींग करेल तेव्हा त्याने एमटीडीसीच्या पर्यटक निवासाला प्राधान्य द्यायवा हवे, अशा पद्धतीने चांगल्या दर्जाच्या सेवा-सुविधांची तिथे उपलब्धता करा. स्काय-हायसोबत आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील साहसी पर्यटनाला चालना मिळणार आहे. अशा सर्व माध्यमातून राज्यातील पर्यटन वैभव जगभरासमोर खुले करण्यासाठी यापुढील काळातही पर्यटन विभागाला सर्वतोपरी प्रोत्साहन देण्यात यईल, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन विकासावर राज्य शासनाचे विशेष लक्ष

राज्याच्या पर्यटनवाढीसाठी आपण अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. पर्यटन विभागाला अधिकचा निधी देण्याची सरकारची तयारी आहे, कारण पर्यटन क्षेत्रात मोठी ताकद आहे. पर्यटकांच्या माध्यमातून देशाचा इतिहास जगभरात पोहोचतो, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो, अर्थव्यस्थेला चालना मिळते. जगभरात अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनक्षेत्र सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे, त्यामुळे राज्यातील पर्यटन विकासावर राज्य शासनाचे विशेष लक्ष आहे. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटन दिनाचे औचित्य साधून राज्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील घटकांबरोबर २ हजार ९०५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार आपण केले. या सामंजस्य करारामुळे राज्यातील पर्यटनक्षेत्राला चालना मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

(हेही वाचाः अभियंत्यांना उल्लू बनाविंग)

पर्यटन साक्षरता हवी

एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमधील सेवा-सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा आणि स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. तसेच लोकांना पर्यटन साक्षर करणे, पर्यटनस्थळी केरकचरा, प्लॅस्टीक न टाकणे, ऐतिहासिक वास्तुंवर काहीही न लिहिणे याबाबत पर्यटकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. याशिवाय एमटीडीसी आणि पर्यटन विभागाच्या वेबसाईटस् इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांबरोबरच मराठीमध्येही उपलब्ध असाव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी यावेळी केल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.