म्युकरमायकोसिस औषधाच्या नावाखाली फसवणूक!

म्युकरमायकोसिसच्या एक इंजेक्शनसाठी ६ हजार प्रमाणे ६० इंजेक्शनसाठी ३ लाख ६० हजार रुपये मागितले. 

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यानंतर आता म्युकरमायकोसिस या आजारावर उपयुक्त औषधांचा तुटवडा जाणवत आहे. म्युकरमायकोसिस या औषधाचा काळाबाजार सुरू असून या औषधासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक सुरू आहे. तसा एक प्रकार मुंबईतील बोरिवली येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

भोपाळमधून नातेवाइकांनी मागितली औषधे!

रुपेश मोहिते असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून रुपेश हा एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या वाहनावर चालक म्हणून नोकरीला आहे. बोरिवलीतील एलआयसी कॉलनीत राहणारे रौनक अग्रवाल यांचे एक नातेवाईक भोपळमध्ये रुग्णालयात म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार सुरू आहेत. त्यांना म्युकरमायकोसीस या आजारावर उपयुक्त औषधाचे ६० डोसची गरज असून भोपाळमध्ये हे औषध उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक यांनी रौनक यांना फोन करून मुंबईतून हे औषध पाठवण्याची विनंती केली होती. रौनक यांनी बोरीवलीतील मेडिकल दुकानात या औषधाची चौकशी केली असता औषध उपलब्ध नसल्याचे कळले.

(हेही वाचा : नक्षल चळवळीसाठी आता मराठा समाज लक्ष्य! )

एका इंजेक्शनमागे ६ हजाराप्रमाणे साडेतीन लाख मागितले!

दरम्यान एका मेडिकल दुकानात काम करणाऱ्या परेश जेठवा याने रुपेश मोहितेचा मोबाईल क्रमांक रौनक याला दिला आणि हे तुम्हाला औषध मिळवून देईल, असे सांगितले. रौनक यांनी रुपेशला फोन करून औषधाची विचारणा केली असता एका डोसला ६ हजार रुपये प्रमाणे ६० डोस साठी ३ लाख ६० हजार लागतील, असे सांगून ५० टक्के आगाऊ रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले. रौनक याने ताबडतोब १ लाख ८० हजार रुपये रुपेश याच्या बँक खात्यात जमा केले होते.

… आणि फसवणूक झाली!

त्यानंतर मात्र रुपेशने औषध देण्यास टाळाटाळ केली, रौनकने पैशांची मागणी केली असता ते देखील देण्यास रुपेशने टाळाटाळ करून पैसे परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रौनक अग्रवाल यांनी एमएचबी पोलिस ठाण्यात धाव घेऊन रुपेश मोहिते यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा : जगभरात १६० दशलक्ष मुले पोटापाण्यासाठी राबतायेत!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here