पुण्यात वाढत आहेत म्युकरमायकोसीसचे रुग्ण

धक्कादायक बाब म्हणजे, 13 मेपासून आतापर्यंत 172 नव्या रुग्णांची यात भर पडल्याचे समोर येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर, तसेच ग्रामीण भागांत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच, आता एक नवीन संकट येथील नागरिकांसमोर उभे ठाकले आहे. पुण्यात काळ्या बुरशीजन्य म्युकरमायकोसीस आजाराने बाधित असलेल्या रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, शहरात एकूण 43 रुग्णालयांत म्युकरमायकोसीसचे तब्बल 463 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

अशी आहे रुग्णसंख्या

सध्या पुणे शहरात 373, पिंपरी-चिंचवड येथे 78 आणि ग्रामीण भागात 12 असे एकूण 463 रुग्ण म्युकरमायकोसीसवर उपचार घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, 13 मेपासून आतापर्यंत 172 नव्या रुग्णांची यात भर पडल्याचे समोर येत आहे. अँटिफंगल औषधे या आजारावर उपचार म्हणून प्रभावी ठरत आहेत. त्यासाठी राज्य सरकारने 1 लाख 91 हजार इंजेक्शनची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी जिल्हा प्रशासनाकडून वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधे आणि इंजेक्शनची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय सिंह देशमुख यांनी दिली आहे.

(हेही वाचाः म्युकरमायकोसीस वरील उपचारासाठी डॉक्टरांची तारेवरची कसरत)

काळाबाजार रोखण्यासाठी प्रयत्न

या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. शनिवारपर्यंत रुग्णालयांना एम्फोटेरिसीन बी ची 260 इंजेक्शन, इजावुकोनाजोल-372 ची 25 इंजेक्शन्स आणि पॉसकोनाजोलच्या 125 गोळ्या वितरित करण्यात आल्या आहेत, अशीही माहिती देशमुख यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here