सावधान! म्युकरमायकोसिस आता कोरोनाला मागे टाकतोय!

मागील आठवड्यात राज्यात म्युकरमायकोसिसचे १ हजार ४५० नवे रुग्ण आढळून आले, तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

140

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही संख्या इतकी वेगाने वाढू लागली आहे की राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ही रुग्ण संख्या कोरोनाच्या सक्रिय रुग्ण संख्येपेक्षा अधिक झालेली आहे, ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे.

म्युकरमायकोसिस रुग्णांचे बरे होण्याची गती कमी!  

म्युकरमायकोसिस हा अतिशय खर्चिक आजार असून मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय रुग्णांनाही न परवडणारा आहे. राज्यात सप्टेंबर २०२० मध्ये नागपुरात पहिला कोरोनामुळे म्युकरमायकोसिसची लागण झालेला रुग्ण आढळून आला होता, त्या रुग्णाला उपचारासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करावे लागले, तरीही त्या रुग्णाचा एक डोळा काढावा लागला, अशा प्रकारे रुग्णांना आंधळा करणारा आणि वेळीच उपचार झाले नाही, तर जीव घेणारा हा रोग राज्यात झपाट्याने वाढू लागला आहे. मागील आठवड्यात राज्यात म्युकरमायकोसिसचे १ हजार ४५० नवे रुग्ण आढळून आले, तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यात म्युकरमायकोसिसच्या सक्रिय रुग्णांची संख्या २,२४५ इतकी झाली आहे. तुलनेत केवळ २४३ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत, यावरून या आजाराच्या रुग्णांची बरे होण्याची गती देखील कमी आहे. अशा प्रकारे आता या आजारामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. १००७ रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार होत असले, तरी खासगी आणि सरकारी रुग्णालयातील एकूण २,२४५ रुग्णांना प्रत्येकी १०० इंजेक्शन लागतात, त्या तुलनेत राज्याला २ लाख २४ हजार इंजेक्शनची गरज भासणार आहे. मात्र केंद्र सरकारकडून या रोगावर परिणामकारक अँफोटेरेसीन-बी या इंजेक्शनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नाही, त्यामुळे उपचारावर परिमाण होत आहे. आजमितीस राज्यात ६,००३ म्युकरमायकोसिसची एकूण रुग्ण संख्या झाली आहे.

(हेही वाचा : म्युकरमायकोसिस झाला, दीड कोटींचा खर्च केला, तरीही डोळा गमावला!)

नागपुरात म्युकरने कोरोनाला टाकले मागे!

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी ‘म्युकरमायकोसिस’ (काळी बुरशी) या आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोरोनाचे २१० अत्यवस्थ रुग्ण भरती झाले आहेत, तर त्याहून दुप्पट म्हणजे ४२८ ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण शासकीय आणि खासगी रुग्णालयांत भरती झाले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत कोरोनाबाधितांच्या तुलनेत ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण दुपटीहून अधिक असल्याने आरोग्य विभागावरील ताण कायम आहे. आजवर जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे एकूण १ हजार ४७५ रुग्ण आढळले. त्यातील १ हजार ७२ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली असून ९१६ रुग्णांना रुग्णालयांतून घरी पाठवले. पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यांत ‘म्युकरमायकोसिस’चे ५४६ रुग्ण विविध रुग्णालयांत भरती आहेत. त्यातील ७८.३८ टक्के म्हणजे ४२८ रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. इतर ११८ रुग्ण भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा या ४ जिल्ह्यांतील विविध रुग्णालयांत आहेत. गडचिरोलीत या आजाराचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे म्युकरमायकोसिसला जर वेळीच आवर घातला नाही तर मात्र नागपूरनंतर आणखी जिल्ह्यांमध्ये म्युकरमायकोसिसची रुग्ण संख्या कोरोनाच्या रुग्ण संख्येला मागे टाकेल, अशी शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

पुणे जिल्ह्यात ८०२ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत, औरंगाबाद ७०२, नाशिक ३५०, सोलापूर ३२६, मुंबई ३१९, अहमदनगर २१८, सांगली २०९, ठाणे २०५ अशा प्रक्रारे एकूण १ हजार ४५० रुग्ण मागील आठवड्यात सापडले आहेत. आजवरची एकूण ६,००३ रुग्णसंख्या झाली आहे.

(हेही वाचा : म्युकरमायकोसिस: उपचार नको डोळेच काढा! असे म्हणतील गोरगरीब!  )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.