भांडुपमध्ये मल्टीस्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय; प्रस्ताव मार्चमध्ये मंजूर, भूमिपूजन जानेवारीत

मुंबई महापालिकेच्यावतीने भांडुप नाहूरगाव येथे ३६० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाचा प्रस्ताव मार्च २०२२मध्ये मंजूर करण्यात आला. परंतु आता तब्बल दहा महिन्यांनी या रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेऊन याचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे. या रुग्णालयामुळे भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी इत्यादी परिसरातील साधारणपणे १२ ते १५ लाख लोकसंख्येला सर्वोपचार वैद्यकीय सेवेसह अतिविशेष सेवा देखील उपलब्ध होणार आहेत. हे रुग्णालय सन २०२५ च्या अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल.

कसे असेल रुग्णालय?

मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागातील नाहूरगांव येथे ३६० रुग्णशय्या क्षमतेच्या रुग्णालयाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तब्बल ७१,५४७.६६ चौ. मी. एवढे बांधकाम क्षेत्रफळ असणारे हे रुग्णालय तळघर, तळमजला आणि त्यावरील ९ मजले यानुसार एकूण ११ मजल्यांचे असणार आहे. तर या व्यतिरिक्त १० मजल्यांची कर्मचारी निवासी इमारत देखील बांधण्यात येणार आहे. तसेच या रुग्णालयात रुग्णवाहिकेसह १०३ वाहने उभी राहतील एवढे भव्य वाहनतळ देखील असणार आहे. या रुग्णालयात प्रस्तावित करण्यात आलेल्या ३६० रुग्णशय्यांपैकी १९० रुग्णशय्या या वैद्यकीय शल्यचिकित्सा, स्त्रीरोग, प्रसूति, ट्रॉमा, बालरोग, नवजात शिशू, कान-नाक-घसा, नेत्ररोग व अपघात यासाठी असणार आहेत. ३० अतिदक्षता रुग्णशय्या या वैद्यकीय, नवजात शिशू, अपघाती रुग्ण यांच्याकरिता असणार आहेत. १०० अतिविशेष सर्वसाधारण रुग्णशय्या या न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, कर्करोग व पोटाचे विकार यासाठी असणार आहेत. तर उर्वरित ४० रुग्णशय्या या ‘अतिविशेष अतिदक्षता’ यासाठी असणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त शल्यचिकित्सा गृहांमध्ये १३ रुग्णशय्या असणार आहेत.

(हेही वाचा शरद पवारांचा अजित पवारांवर विश्वास नाही; केंद्रीय मंत्र्यांचे विधान)

१२ ते १५ लाख लोकसंख्येला सर्वोपचार वैद्यकीय सेवा

या रुग्णालयामध्ये इमर्जजन्सी मेडिकल सर्व्हिसेससह, क्ष-किरण (एक्सरे), सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर, सिटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, प्रगत प्रयोगशाळा, रक्तपेढी आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी केमोथेरपी वॉर्ड देखील असणार आहे. या रुग्णालयामुळे भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी इत्यादी परिसरातील साधारणपणे १२ ते १५ लाख लोकसंख्येला सर्वोपचार वैद्यकीय सेवेसह अतिविशेष सेवा देखील उपलब्ध होणार आहेत. हे रुग्णालय सन २०२५ च्या अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल, अशी अपेक्षा आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने कॅपासिटे-ई –गव्हर्नन्स या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड करण्यात आली आहे. या बांधकामासाठी विविध करांसाठी सुमारे ७७० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कंपनीने सैफीट्रस्ट यांची रहिवाशी व व्यापारी इमारतींचे बांधकाम केले आहे, तसेच वाराणसी येथे कर्करोग निवारण केंद्राचेही बांधकाम केले आहे. या इमारतीचे आराखडे व बांधकामाचे नकाशे बनवण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून शशी प्रभू एँड असोशिएट्स कंपनीची नेमणूक केली आहे. हा प्रस्ताव ७ मार्च २०२२ रोजी स्थायी समितीच्या शेवटच्या सभेत घाईघाईत मंजूर करण्यात आला होता, परंतु आता दहा महिन्यांनंतर आता या बांधकामाचे भूमिपूजन केले जात आहे. त्यामुळे प्रस्ताव मंजूर करण्याची घाई तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी का दाखवली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here