मुलुंड (पश्चिम) येथील महाराणा प्रताप जंक्शन येथे पादचा-यांसाठी आकाश मार्गिका (स्काय वॉक) उभारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. बेस्ट बस आगार आणि प्रस्तावित मेट्रो स्थानकाला जोडल्या जाणा-या या आकाश मार्गिकेमुळे वाहतुकीची कोंडी काहीशी कमी होऊन मुख्य म्हणजे पादचा-यांचा प्रवास सुकर होईल.
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणखी रस्ते व पूल बांधणी करण्याबरोबरच आकाश मार्गिकांची उभारणी करण्याचे नियोजन आहे. महानगरपालिकेच्या टी विभाग अंतर्गत येणा-या मुलुंड (पश्चिम) येथील लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. या ठिकाणी पाच रस्ते एकमेकांना मिळतात. सततच्या वाहनांच्या रहदारीमुळे पादचाऱयांना रस्ता ओलांडणे जिकीरीचे होते. या ठिकाणी सध्या बेस्ट आगार देखील आहे, त्यामुळे पादचा-यांची वर्दळ कायम असते. या पार्श्वभूमीवर, वाहतूक प्रगणकांनी नुकतीच या रस्त्यावरील पादचारी संख्या आणि रहदारी प्रमाणाचे सर्वेक्षण केले. तसेच सल्लागार संस्थेमार्फत व्यवहार्यता अहवालही तयार करण्यात आला.
(हेही वाचा Mukesh Khanna : नसीरुद्दीन शाह यांना मुकेश खन्नांनी सुनावले; म्हणाले, ‘लव्ह जिहाद’च्या टीममध्ये सामील व्हा)
विविध उपाययोजना आणि पर्यायांचा विचार करता महाराणा प्रताप जंक्शन येथे पादचाऱ्यांसाठी आकाश मार्गिका उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या आकाश मार्गिकेमुळे नियमितपणे ये – जा करणाऱ्या पादचाऱ्यांना मदत होणार आहे. तसेच, प्रस्तावित मेट्रो स्थानकाला आकाश मार्गिका जोडली जाणार असल्याने रस्त्यावरील पादचाऱ्यांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की, नियोजित आकाश मार्गिकेची एकूण लांबी ४५१.१६ मीटर आणि रुंदी ३ मीटर असेल. आकाश मार्गिकेचे बांधकाम पाइल फाउंडेशन पद्धतीने केले जाईल. १२५ मिलीमीटर जाडीच्या काँक्रिट डेक स्लॅबसह स्टील कंपोझिट प्लेट गर्डर्स यांचा बांधकामात समावेश असेल. अत्याधुनिक सरकते जिने आणि पायऱयांमध्ये अँटी-स्किप टाइल्स स्लॅब प्रस्तावित आहेत. छतासाठी पॉलीप्रोपीलीन पत्रे वापरले जाणार आहेत. पायाचे बांधकाम पाईल फाऊंडेशन केले जाणार असून स्ट्रक्चरल स्टील व आर. सी. सी. पाईलने बांधकाम केले जाणार आहे. पुलाचे पृष्ठीकरण काँक्रिट स्लॅबने केले जाणार आहे, असे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community