मुंबईतील ८ वकिलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल! पीडित महिलाही वकीलच!

पीडित महिला वकील दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एका बड्या वकिलाच्या फर्ममध्ये कामाला होती. त्याच फर्ममधील सहकारी वकिलांनी अत्याचार केला.

मुंबईतील ८ वकिलांवर बलात्कार, खंडणी विनयभंगाचा गुन्हा मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या आठ जणांमध्ये दोन महिला वकिलांचा समावेश आहे. अश्लील व्हिडिओ क्लिप काढून ५० लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप पीडित महिला वकिलाने केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दिली आहे.

मुख्य वकिलाने ५० लाख रुपयांची खंडणी मागितली!

पीडित वकील महिला ही ३० वर्षांची असून ती अंधेरी परिसरात राहणारी आहे. दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एका बड्या वकिलाच्या फर्ममध्ये ती कामाला होती. त्याच फर्ममध्ये इतर वकील देखील काम करीत होते. पीडित महिलेने सोमवारी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात येऊन मुख्य वकील आणि इतर सहकारी वकील तसेच दोन महिला वकिलांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने माझ्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ काढून माझ्याकडे मुख्य वकिलाने ५० लाख रुपयांची खंडणी मागितली, तसेच इतर वकिलांनी माझा विनयभंग करून अश्लील टोमणे मारणे, मारहाण करून छळ केल्याची तक्रार पीडित महिला वकिलाने केली आहे.

(हेही वाचा : …म्हणून मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर साताऱ्यात उतरलेच नाही!)

महिला वकिलांनीही केली छळवणूक!

या सर्वांना दोन महिला वकिलांनी साथ दिली व त्यांच्याकडून देखील माझी छळवणूक सुरु होती, असे देखील तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोन महिला वकिलांसह ८ जणांविरुद्ध बलात्कार, खंडणी, विनयभंग, मारहाण करणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here