मुंबईत पुन्हा रुग्णांचा, मृत्यूचा आकडा फुगला!

दिवसभरात ७८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ४० रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते.

125

मुंबईत मागील तीन दिवसांपासून तीन ते चार हजारांच्या आसपास आलेल्या रुग्ण संख्येचा आकडा पुन्हा एकदा फुगला. रुग्णांचा आकडा फुगलाच नाही तर मृत्यूचाही आकडा वाढला आहे. बुधवारी 28 एप्रिल रोजी दिवसभरात एकूण ४ हजार ९६६ रुग्ण आढळून आले असून ७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील तीन दिवसांपासून चाचण्यांचे कमी झालेले प्रमाण दिवसेंदिवस वाढवले जात आहे, त्याप्रमाणे आता रुग्णांचाही आकडा वाढताना दिसत आहे. मुंबईत १ मेपर्यंत अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते, हे आता १५ मेपर्यंत वाढवले जाणार आहे. मात्र, रुग्ण संख्या ज्याप्रमाणात कमी होत होती, ती संख्या लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय झाल्यानंतर पुन्हा वाढू लागल्याने मुंबईकरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. दिवसभरात ४,९६६ रुग्ण आढळून आले, तर ५,३०० रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.

४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा ३४!

बुधवारी दिवसभरात एकूण ६५ हजार ५८९ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु होते. मात्र सोमवारी २८ हजार ३२८, मंगळवारी ३० हजार ४२८ आणि बुधवारी त्यामध्ये वाढ होत ३९ हजार १३५ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. तर दिवसभरात ७८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ४० रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. तर यामध्ये ५१ पुरुष व २७ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ६ रुग्ण हे ४० वयोगटाच्या खालील आहेत. तर ३८ रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. आणि ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा ३४ एवढा होता.

(हेही वाचा : मुंबईत लसींचा साठा संपला, नागरिकांना मिळणार केवळ दुसरा डोस!)

कोविड वाढीचा दर हा ०.९३ टक्के होता!

मुंबईत मंगळवारी रुग्ण दुपटीचा दर हा ६८ दिवसांवर होता. तिथे तो बुधवारी ७४ दिवसांवर आला होता. तर रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ८७ टक्के एवढा होता. तर कोविड वाढीचा दर हा ०.९३ टक्के होता. बुधवारपर्यंत जास्त लक्षणे असलेल्या व चिंताजनक झालेल्या २१ हजार ८०६ रुग्णांवर विविध ठिकाणच्या कोविड रुग्णालयांमध्ये तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते.

मुंबईतील १२० झोपडपट्टी, चाळी कंटेन्मेंट झोनमध्ये

मुंबईतील मागील ११४ आकड्यांवर सीमित असलेल्या झोपडपट्टी व चाळींच्या कंटेन्मेंटची संख्या आता १२० एवढी झाली आहे. तर मुंबईतील १,११४ इमारती या सिल करण्यात आल्या आहेत.

मंगळवारी पार पडले ७२ हजार ६०६ जणांचे लसीकरण

मंगळवारी दिवसभरात सर्वाधिक ७२ हजार ६०६ जणांचे लसीकरण पार पडलेले असतानाच बुधवारी पुन्हा या लसीकरणाचा आकडा खाली घसरला. बुधवारी दिवसभरात ४४ हजार ६२९ जणांचे लसीकरण पार पडले. ज्यामध्ये २० हजार २७१ जणांनी पहिला डोस, तर २४ हजार ३५८ जणांनी दुसरा डोस घेतला. यामध्ये ४५ ते ५९ वयोगटातील १८ हजार ३२२ जणांचे लसीकरण झाले, तर ६० वर्षांवरील २१ हजार ७३० जणांचे लसीकरण झाले. दिवसभरात आरोग्य विभागाच्या १,९७४ आणि फ्रंटलाईन वर्करचे २,६०३ जणांचे लसीकरण पार पडले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.