वर्षाचे सात महिने प्रदूषणाचे; ‘या’ महिन्यांत ढासळतोय हवेचा दर्जा

134

मुंबईतील थंडीच्या मोसमात हवेचा दर्जा ढासळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळते. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात २०२१ साली मुंबईत केवळ थंडीत नव्हे तर संपूर्ण सात महिने वायूप्रदूषणामुळे हवेचा दर्जा ढासळल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. ३६५ दिवसांपैकी २५० दिवस मुंबईतील हवेने धोक्याची पातळी ओलांडली होती, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटी या पर्यावरणप्रेमी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. केवळ मुंबईतच नव्हे तर नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथेही हवेचा दर्जा ढासळत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. वायू प्रदूषणामुळे केवळ सर्दी, खोकलाच नव्हे तर क्षयरोग, कर्करोग आणि हृदयविकारातही वाढ होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यासह मुंबई महानगर परिसरात हवा गुणवत्ता मापन केंद्र उभारले आहे. मुंबईत १५ ठिकाणी हवा गुणवत्ता मापन उभारण्यात आले आहे. २०२१ साली १२ महिन्यांमध्ये वायू प्रदूषणाची माहिती घेतली असता मे ते सप्टेंबर या महिन्यांत वायू प्रदूषण कमी नोंदवले गेले. पावसाळ्याच्या आगमनाअगोदर मे महिना ते संपूर्ण पावसाळ्यात वायू प्रदूषण नव्हते. ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यापर्यंत मुंबईतील हवेत घातक धूलिकणांची मात्रा मिसळत असल्याचे तज्ज्ञांना आढळले.

वायू प्रदूषणास कारणीभूत घटक 

हवेत सूक्ष्म धूलिकण (पीएम२.५), धूलिकण (पीएम१०), नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोक्साइड, अमोनिया, आनी ओझोन हे सर्व घटके मिळून किंवा किमान तीन प्रदूषणे लक्षात घेत संबंधित विभागातील हवेची गुणवत्ता तपासणी जाते. प्रत्येक प्रदूषकांची स्वतःची वेगळी स्वतंत्र नोंदही असते.

( हेही वाचा: स्थूलता ठरतेय ‘या’ जीवघेण्या आजाराचे कारण… )

२५० दिवसांतील हवेचा दर्जा 

  • दिवस — हवेचा दर्जा आणि वर्गवारी
  • १०३ — ० ते ५० निर्देशांकातील हवेचा दर्जा आरोग्यासाठी चांगला मानला जातो. मुंबईत १०३ दिवस हवा चांगल्या वर्गवारीत होती.
  • १२६ — ५० ते १०० निर्देशांकातील हवेचा दर्जा प्रदूषित मानला जातो. अगोदरपासूनच आजारी असलेल्या रुग्णांनी या निर्देशांकातील ठिकाणांना भेट दिल्यास आजारपण वाढण्याची भीती असते.
  • ७४ — १०१ ते २०० निर्देशांकातील हवेचा दर्जा थोडा जास्त प्रदूषित असतो. हृदय, फुफ्फुसाच्या, दम्याने त्रासलेल्या लोकांना, लहान मुले तसेच वृद्धांना या निर्देशांकातील ठिकाणी त्रास होतो.
  • ४४ — २०० ते ३०० निर्देशांकातील हवेचा दर्जा आरोग्यासाठी हानिकारक मानला जातो. सर्व नागरिकांना श्वसनाच्या,हृदयाच्या, आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
  • ३ – ३०१ ते ४०० निर्देशांकातील हवेचा दर्जा मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतो. सर्वांना श्वसनाचे विकार जडण्याची भीती असते. हवेचा निर्देशांक या पातळीवर पोहोचल्यास स्थानिकांनी घरातच राहावे.

तज्ज्ञांची मागणी – 

स्थानिक महानगरपालिका, आमदार तसेच खासदारांनी आपापल्या विभागातील प्रदूषण आणि नागरिकांना होणा-या आरोग्याच्या समस्येवर उपाययोजना म्हणून सरकारी पातळीवर धोरणात्मक योजनांची मागणी करावी- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लानेट सोसायटी

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.