- राजू पाटील
२६/११ ला जो दहशतवादी हल्ला (Mumbai Attack) झाला त्या दिवशी मी बॉम्ब डिटेक्शन डिस्पोझल स्कॉड विभागात मुंबई येथे सेवेत होतो. योगायोगाने त्या दिवशी माझी नाईट शिफ्ट होती. हा प्रसंगही अनपेक्षितपणे रात्रीच्या वेळीच घडला. मी बॉम्ब टेक्निशियन होतो. त्यावेळी माझ्यासोबत (बॉम्ब टेक्निशियन,)2 अधिकारी व 3 staff तसेच ३ श्वान हस्तक (Dog Handler) होते. नेहमीप्रमाणे सेवेत रुजू झाल्यावर इक्विपमेंट चार्ज झाले का, ते चालू स्थितीत आहेत का हे पहायचं असतं. गाडीची स्थिती काय आहे? डिझेल आहे का? चालक आहे का? श्वानांची प्रकृती ठिक आहे का? ही सर्व कामे आम्ही चेक लिस्टप्रमाणे करतो. साधारणे साडेआठ ते पावणे नऊपर्यंत ही सर्व कामे होतात. त्या दिवशीही ही सगळी कामे कामे करून आम्ही ९:१५च्या दरम्यान सगळे कार्यालयात अधी काढलेल्या सस्पिशियस बॅगच्या एक्सरेचे अॅनलिसिस करीत बसलो होतो. त्यादरम्यान सिनियर पी आय अँथनी सर हे आमचे त्यावेळी इन्चार्ज होते त्यांचा फोन आला होता. ते एसीपी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यावेळी ते आमच्या विभागाचे इनचार्ज होते. ताज जवळ त्यांची क्वॉर्टर्स होती. तिथून फायरिंगचा आवाज त्यांनी ऐकला. फोनवर ते म्हणाले की ‘किधर तो गडबड है|’ आम्हाला असं त्यावेळी वाटत होतं की, तशी काही गडबड दिसत नाही, कारण वायरलेस सेट माझ्या जवळच होते, पण तरीही ते म्हणाले की, ‘ठिक है ध्यान देना’ तोपर्यंत त्यांनी फायरिंगचा आवाज येतोय वगैरे काहीच सांगितलं नव्हतं. त्यानंतर थोड्याच वेळात साडेनऊच्या आधी फायरिंग सुरू झाल्याच्या बातम्या झळकायला लागल्या. आम्हाला साउथ कंट्रोल येथून संदेश आला की, ‘ट्रायडन्ट हॉटेलच्या बाहेर तुम्ही ताबडतोब जाऊन एका संशयित बॅगेची तपासणी करा.’ हा संदेश आल्यावर मी लगेचच आमच्या Incharge यांना कळवलं. ‘सर, तुम्ही बोललात त्याप्रमाणे खरोखरच गडबड आहे. वायरलेस संदेश आल्याचं कळवलं.’ तोपर्यंत हा दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आहे, हे आम्हाला कळलं होतं. त्यानंतर आम्ही गाडी घेऊन ट्रायडन्टला गेलो. जवळचा रुट फॉलो करायचं असतं. ट्रॅव्हलिंग फेझ पूर्वी प्रिपरेशन करायची असते तसेच परिस्थिती पाहून सगळं बघावं लागतं. तिथे गेल्यावर तयारी काय करायची आणि प्रत्यक्ष आयईडी किंवा संशयास्पद वस्तूच्या तपासणीबाबत काय करायचं? कुठल्या प्रकारचा डिस्पोझलचा ऑप्शन घ्यायचा, ते ठरलेल्या SOP नुसार कारवाया करायच्या होत्या. आम्ही ट्रायडेन्ट हॉटेलला पहिल्यांदा गाडी घेऊन गेलो ते दक्षिण बाजूने, परंतु संशयास्पद बॅग समुद्राजवळच्या गेटजवळ ठेवली आहे हे तेथील सिक्युरिटी स्टाफने सांगितलं. म्हणून त्या बाजूला गाडी वळवली.
आमच्याकडे व्हिज्युअलायझेशन टेक्निक असते. ज्या योगे बॅगेचे आकारमान पाहून त्यात किती मात्रामध्ये एक्सप्लोझिव्ह असतील आणि बॉम्बस्फोट झाला तर ब्लास्ट प्रेशर, fragmentationचे परिणाम किती अंतरावर होतील, याची बांधणी अंदाजाने करता येते. त्याप्रमाणे आम्ही ६०-७०मीटरच्या आसपास कमांड पोस्ट करायचं ठरवलं. या सगळ्याचं निरीक्षण आम्ही लांबून करत केलं आणि कमांड पोस्ट अजून थोडी दूर सुरक्षित अंतरावर स्थापन केली. त्या दरम्यान मनुष्यहानी होऊ नये म्हणून तेथे इवॅक्युएशन (evacuation) मात्र १०० टक्के करून घेतले. कमांड पोस्ट येथे SOP प्रमाणे प्रिपरेशन सुरू केली. क्रमाने श्वान, एक्सक्लुझिव्ह डिटेक्टर, एक्सरे काढण्यासाठी लॅपटॉप, बॉम्बसूट घालण्याची तयारी करणं, इत्यादी तयारी सुरू केली.
दहशतवाद्यांचा हल्ला (Mumbai Attack) आहे म्हणजे १०० टक्के बॉम्ब असेलच असे गृहीत धरले. ईश्वराने नकळत संकेत दिला की, बाबांनो काही करू नका, ब्लास्ट झालाच तर कोणीही मरणार नाही याची खात्री करा, समोरील काचा तुटतील, भिंतीला खड्डा पडेल, समुद्राकडे ब्लास्ट प्रेशर आणि स्प्लिंटर्सचा मारा होईल. त्यादृष्टीने पुढील तयारी करत असताना ऑफ बॅचचे अधिकारी, आमचे इनचार्ज सिनियर पीआय अँथनी सर आणि स्टाफ आमच्या मदतीला आले तोपर्यंत आमची स्ट्रेन्थ म्हणजेच टिमही वाढत होती. त्याच दरम्यान त्यावेळचे मुंबईचे तत्कालीन कमिशनर श्री हसन गफूर सर तिथे आले. हे सगळं सुरू असतानाच काही वेळात प्रचंड मोठा धमाका झाला. आम्ही जे व्हिज्युअलाईझ केलं होतं, तसंच झालं. आम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं असतं की, एक स्फोट झाला, तर दुसरा स्फोट ,सेकंडरी ब्लास्ट म्हणतात त्याला तो होऊ शकतो. आम्ही त्या ब्लास्टच्या आवाज आणि सर्व इम्पॅक्टमधून सगळं सावरून लगेचच तेथील परिसर तपासला. तोपर्यंत आमच्या कानातला आवाजही गेला नव्हता. परिसरात प्रचंड धूळ आणि धुराचे लोट होते. तुटलेल्या काचांचे आवाज, ट्रायडेन्टमधील दहशतवाद्यांच्या फायरिंगचे आवाज, हँडग्रेड फुटत असतानाचे आवाज, लोकांचं ओरडणं ऐकत आणि हे सगळं डोळ्यांना दिसत होतं.
(हेही वाचा Chine : चीनमध्ये पसरतोय भयंकर आजार; लहान बालके मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल)
सुदैवाने आमच्यासोबत असलेल्या टीमच्या एकाही सदस्याला अथवा तेथील स्टाफ किंवा व्यक्तिला साधी जखमसुद्धा झाली नाही. सेकंडरी डिव्हाइस चेक करीत असतानाच, ताज हॉटेलच्या समोर दुसऱ्या BD टीमला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळसुद्धा एक संशयास्पद बॅग असल्याचा कंट्रोलचा कॉल होता. तिथे एका श्वानाकडून तपासणी करण्यात आली होती. तिथेही श्वानाने सकारात्मक संदेश दिला होता. तिथेही स्फोटाची शक्यता होती. आमची गाडी डिस्पोझल गाडी असल्याने आम्हाला तेथे जाण्याचे आदेश दिले गेले. त्यानुसार सर्व अंदाज बांधून आम्ही आमची Explosives तपासणी आणि डिस्पोझलची कारवाई सुरू केली. आमच्यासोबत प्रिन्स नावाचा डॉग आणि एक्स्पोझिव्ह डिटेक्टरने तपासणी झाली. त्यानंतर रिमोटली एक्सरे काढायचं ठरवलं. पीएसआय सावंत यांनी बॉम्बसुट घालून त्या संशयित बॅगेचा एक्सरे काढला. एक्सरेचं अॅनलिसिस केलं. त्यानंतर कंडक्टरच्या पेटीसारख्या थोड्या मोठ्या आकाराच्या पेटीत २ डिटोनेटर दिसत होते. २ बॅटरी, १ स्विच तसेच वायरसदृश कॉर्डटेक्स (Cordtex)ची वायर आणि बॉल बेअरिंगचे बॉल्स आणि एक्स्प्लोझिव्ह दिसत होते. (तो PTD स्विच होता, हे नंतर उलगडलं.) बॅटरीचं कनेक्शन detonatorसाठी इलेक्ट्रिक सप्लाय कुठल्या बॅटरीतून होतोय, हे आम्ही एक्सरे मध्ये बघत होतो. मग पुन्हा फायनल अॅनलिसीस झाल्यावर सर्वानुमते डिस्पोझलची एक पद्धत वापरून तो बॉम्ब डिफ्युझ केला. त्यानंतर लगेच ते सुरू असताना ताज हॉटेलच्या मागे बडे मिया किंवा लिओपोर्डकडेही बॉम्ब असण्याची शक्यता आहे, असे कळवले. ताजजवळील हा एक्सरे आणि इथला एक्सरे जुळला. हासुद्धा साधारणपणे ८ किलोचं आरडीएक्स असलेला बॉम्ब कमी वेळात डिफ्युझ करता आला. दरम्यान, काही ताज, ट्रायडेन्टच्या लॉबीजमध्ये तसेच सीएसटी स्थानक, कामा रुग्णालय, इत्यादी ठिकाणी मिस फायर हँड ग्रेनेड असल्याचेही कॉल येत होते. तिथे आमच्या विविध टिम्स जाऊन आम्ही सेफली बॉम्ब ब्लँकेट, बॉम्ब बास्केट मध्ये डिस्पोझ करण्यासाठी गोळा करत होतो. आमच्या टीम्स कधी ट्रायटन्ट, कधी ताजची लॉबी, नरीमन हाऊस अशा ठिकाणी आम्ही फिरत होतो.
नंतर NSG कमांडोज दिल्ली येथून आले. ऑपरेशन्स सुरू होते. दरम्यान ताजला ४ दहशतवादी, ट्रायडन्टला २ दहशतवादी, नरिमन हाऊसला २ दहशतवादी होते त्यांना मारले होते. त्यानंतर कसाबला जिवंत पकडण्यात आले आणि इस्माइलला Girgaon चौपाटीजवळ मारण्यात आले. एकूण किती दहशतवादी, या परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज हे सगळं टॅली करण्यात आलं. एकूण १० दहशतवादी होते. त्यांच्याकडे १० बॉम्ब होते. त्यांनी तिसरा बॉम्ब सीएसटी स्टेशनला सोडलेला Bomb डम्प करून ठेवला होता. आमच्या एक टिमने श्वान पथक, Explosive डिटेक्टर, एक्सरेच्या साहाय्याने तपासणी केली, पण सुदैवाने त्याची बॅटरी डिसकनेक्ट झाली होती. त्यामुळे तो ब्लास्ट झाला नाही. नाहीतर सीएसटी स्टेशनला बऱ्यापैकी हानी झाली असती.
(हेही वाचा NITI Aayog : देशभरात शाळा विलीनीकरणासाठी ‘मध्य प्रदेश मॉडेल’ राबवण्याचा विचार)
शेवटचा दहशतवादी साधारण २७च्या रात्री साडेबारा एकच्या दरम्यान एनएसजीच्या कमांडोजकडून मारला गेल्याने खाली पडलेला आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. सकाळी सगळा परिसर सॅनिटाइझ केल्यानंतर एनएसजीने जाहीर केलं की, ताजमध्ये ४, नरिमन हाऊस २, सीएसटी स्थानकात २, ट्रायडन्ट हॉटेल २, इस्माईल चौपाटीला मारला गेला आणि कसाबला मुंबई पोलिसांनी पकडलं. मग मुंबई कमांडोजने हे operation संपल्याचे जाहीर केले. हे पुढे मुंबई पोलिसांकडे हँडओव्हर केलं. मुंबई पोलिसांनी आमच्या थ्रू पुन्हा हल्ला झालेल्या सर्व ठिकाणी बीडीडीएस पथका मार्फत तपासणी केली. ताज आणि ट्रायडन्टमध्ये काही ठिकाणी अॅमिनेशन(Arms ammunitions)सापडले. जे ऑन ड्युटी होते ते सलग तीन दिवस आम्ही एकाच गणवेशात होतो आणि सॅनिटाइझ करण्याकरिता सर्व हल्ल्याच्या ठिकाणी जात येत होतो.
भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान कराची जवळ आपली गुजरातची कुबेर नावाची मच्छिमारी बोट होती. ती बोट त्यांनी हायजॅक करून मुंबईत सोडण्यास सांगितलं. त्यानंतर बोटीवरील खलाशांनाही तिथेच मारलं. त्याच बोटीतून हे १० दहशतवादी मुंबईत आले होते. या बोटीमध्ये त्यांच्या खायच्या वस्तू, बॉम्ब बनवण्याचे साहित्य, पाणी, एके ४७ यासह त्यांच्याकडे स्पीड बोट होती. त्यांनी कुबेर बोटीचा नावाडी सोळंकी याला ठार केलं. त्यानंतर स्पीड बोटमध्ये हवा भरून बधवार पार्कला आले. बधवार पार्कवरून ४ जण ताजकडे, २ जण सीएसटी, २ जण ट्रायडन्टकडे आणि २ जण नरिमन हाऊसकडे गेले. आपलं जास्त नुकसान कसाब आणि इस्माइलने केलं. त्यांना दिलेल्या जबाबदरीप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आणलेले १० बॉम्ब बॉम्बस्फोट करण्याच्या उद्देशाने ठेवले. त्यापैकी ७ ब्लास्ट झाले आणि ३ मुंबई पोलिसांच्या आमच्या बीडीडीएस टीमने निकामी केले. हिमालय ब्रिजजवळून कसाब आणि इस्माइल कामा हॉस्पिटलमध्ये गेले. तिथेही गोळीबार केला. हॉस्पिटलबाहेरही गोळीबार केला. त्यानंतर सेंट्रल रिजनचे अपर पोलीस आयुक्त सदानंद दाते सर त्यांच्या पथकासह तिथे गेले होते. दाते सर आणि त्यांच्या पथकानेही दहशतवाद्यांना झुंज दिली. त्या नंतर हे दोघे दहशतवादी कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएमकडे थांबले होते. तिथून एका क्वॉलिस गाडीत विजय साळसकर सर, हेमंत करकरे सर, व इतर येत होते. त्यांची गाडी टाईम्स ऑफ इंडियाकडून कामा हॉस्पिटलच्या दिशेने मदतीला जायला निघाली होती. हे पाहिल्यावर या दोघांनी अंधाधुंद गोळीबार केला. अक्षरश: त्या गाडीची चाळण झाली. तीच गाडी त्यांनी हायजॅक करून ते विधानभवनकडे चालले होते. त्यावेळी त्या गाडीचा मागचा टायर फुटला. त्यामुळे त्यांनी स्कोडा गाडी हायजॅक केली. तोपर्यंत सगळीकडे नाकाबंदी सुरू झाली होती. यादरम्यान स्कोडा चौपाटी कडे आल्याने तेथे चकमक होऊन तुकाराम ओंबळे शहीद झाले. इस्माईल दहशतवादी मारला गेला आणि कसाब जिवंत सापडला. हा हल्ला सुरू असताना आम्हाला सापडलेले हँण्ड ग्रॅनेड सुरक्षित करून मुंबई पोलीस कडे तपासकामी हँडओव्हर केले. ते पुढे त्यांनी कोर्टात पुरावे दाखवण्यासाठी सादर केले. सदर हल्ल्यानंतर जवळजवळ १० दिवस हॉटेल ट्रायडन्ट आणि हल्ला केलेल्या इतर परिसरात सॅनिटायझेशनचे काम सुरू होते.
एक अधिकारी म्हणून सांगेन की…
या हल्ल्याबाबत आपल्याला कोणतीही खात्रीलायक माहिती आधी मिळालेली नव्हती. त्यामुळे हा अनपेक्षित, बेसावध असताना झालेला हल्ला होता. दहशतवादी काय किंवा कोणीही आलं आणि त्याने शस्त्राचा वापर केला, तर आपल्याकडे कोणीही सामान्य काहीही करत नाही. ते अशा लोकांना अडवायला जात नाही. लोकांनी सजग राहायला हवं. प्रत्येक क्षण सावधगिरी, सजगता बाळगली पाहिजे. नागरिकांनी १०० किंवा ११२ क्रमांकावर संपर्क साधावा. आपण सुरक्षित कसं राहू याची दक्षता घ्यावी. अशा वेळी आपलं निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने डोळे आणि कान सतत जागरूक ठेवायला हवेत.
या घटनेतून काय बोध मिळाला?
सुरक्षा यंत्रणेत महाराष्ट्राच्या सागरी पोलीस दलाने समुद्र कवच ही संकल्पना त्यांच्या वतीने राबवायला सुरुवात केली. या मोहिमध्ये सागरी पोलीस, लोकल पोलीस, कोस्टगार्ड, इन्डियन नेवी इत्यादी विभाग आणि स्थानिक किनार्यावरील प्रतिनिधी सहभागी असतात. या सर्व विभागांमध्ये समन्वय असला पाहिजे आणि समुद्र किनारी राहिवास्यांना सतर्क केलं पाहिजे.
(लेखक ठाणे शहर जलद प्रतिसाद पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत.)
Join Our WhatsApp Community