मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या जी-दक्षिण विभागातील वरळी परिसरात रस्ता दुभाजक सुशोभित करण्यात आले आहेत. यामध्ये खान अब्दुल गफार खान रस्त्यावरील दुभाजकांवर फुल झाडांची रोपटे लावण्यात आली आहेत. या फुललेल्या झाडांच्या ताटव्यामुळे वांद्रे-वरळी सिलिंग वरून शहरात प्रवेश केल्यावर गुलाबी, लाल , जांभळा, पट्टेरी लाल, निळा , पांढरा अशी विविध रंगांची मनमोहक फुलझाडे लक्ष वेधून घेत आहेत.
मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत प्रत्येक विभाग कार्यालयांच्या हद्दीत विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये वरळीतील खान अब्दुल गफारखान रोड, अर्थात (वरळी सी फेस रोड) येथील रस्ता दुभाजकावर जी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने फुलझाडे लावली आहेत. त्यामुळे वांद्रे वरळी सी-लिंकवरुन वरळीमध्ये प्रवेश करताच फुलांचा हा ताटवा अनेकांच्या मनाला प्रसन्न करत आहे.
ही फुलझाडे पेटुनिया ग्रँडी फ्लोरा असून गुलाबी, लाल, जांभळा, पट्टेरी लाल, निळा, पांढरा अशी विविध रंगांची फुले या फुलझाडाला येतात. तापमानानुसार 3 ते 5 महीने ही झाडे रंगबेरंगी फुलांची उधळण करत राहतात. मुळचे दक्षिण अमेरिका येथील ही प्रसिद्ध फुलझाडे आहेत. दुबई येथील मिराकल गार्डनमध्ये ही फुलझाडे मोठ्या प्रमाणात लावली जातात. संकरित बियाणे लावून याची नर्सरीमध्ये रोपे तयार केली जातात. चांगली तयार झालेली रोपे मग रस्ता दुभाजकावर लावली जातात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
( हेही वाचा: महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद: महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं )
‘या’ मार्गांवर आकर्षक फुलझाडांच्या कुंड्या!
या सुंदर रंगीत नक्षीकाम केलेल्या कुंड्यांमध्ये शेवंती, तोरण आदी विविध रंगी फुले फुलली आहेत. या फुलांनी बहरलेल्या कुंड्या ऍनी बेझन्ट रोड तसेच लाला लजपत राय मार्गावर दुतर्फा ठेवण्यात आल्या आहेत. या आकर्षक फुलांच्या कुंड्या लक्ष वेधक ठरत आहेत.
Join Our WhatsApp Community