राज्यात लसीकरणाचा वेग चांगलाच वाढलेला आहे. शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातही लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असतानाच आता मुंबईने लसीकरणात नवा विक्रम नोंदवला आहे. कोरोना लसीकरणाच्या बाबतीत आता मुंबई राज्याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबईने लसीकरणात 1 कोटींचा टप्पा पार केला आहे.
कोविड-१९ लसींचे १ करोडहून अधिक डोस देणारा, मुंबई हा भारतातील पहिला जिल्हा ठरला आहे.
मुंबईला पूर्णत: कोविडमुक्त करण्यासाठी सहकार्य करा, कोविड-१९ प्रतिबंधक लस घ्या!#1CroreVaccinatedMumbaikars #NaToCorona pic.twitter.com/VauMLT2wrE
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 4, 2021
अशी आहे आकडेवारी
कोरोनाच्या तिस-या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत जगासमोर मुंबई मॉडेलचा आदर्श निर्माण करणाऱ्या मुंबई महापालिकेने आता लसीकरणामध्येही देशात उच्चांक गाठला आहे. कोविन अॅपवर जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळपर्यंत 1 कोटी 2 लाख 67 हजार 836 लसवंतांचे लसीकरण करण्यात आले आहेत. यामध्ये 73 लाख 15 हजार 852 जणांना पहिला डोस, तर 29 लाख 51 हजार 984 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. यामुळेच मुंबई जिल्हा देशातही अव्वल ठरला आहे.
227 वॉर्डांमध्ये लसीकरण केंद्रे
मुंबईत 16 जानेवारीपासून पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांत लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र या धोरणाप्रमाणे 227 वॉर्डांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. शिवाय खासगी रुग्णालये, सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली. विशेष म्हणजे अनेक वेळा पालिकेला पुरेशा लसींचा साठा मिळत नसतानाही योग्य नियोजन आणि सक्षम यंत्रणेमुळे एक कोटी डोस देण्याचा टप्पा पार केला आहे. सद्यस्थितीत पालिका, राज्य सरकार आणि खासगी रुग्णालये मिळून 450 पेक्षा जास्त केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.
Join Our WhatsApp Community