मुंबईकरांना खिशाला कात्री बसणार आहे, कारण बेस्टने १८ टक्के वीजदर वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. एप्रिलपासून मुंबईकरांच्या वीज बिलात ही वाढ होणार आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर यांनी वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्यामध्ये भर म्हणून आता बेस्टनेही दरवाढ सुचवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना महागाईची झळ आणखी सोसावी लागण्याची चिन्हे आहेत.
बेस्टने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, दुकाने, कार्यालये आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी दिलासा मिळणार आहे. या वीज ग्राहकांसाठी बेस्टने 6 टक्के शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा प्रस्ताव स्विकारल्यास मुंबईकरांना महागाईचा झटका बसणार आहे. एकीकडे महागाईच्या झळा सर्वसामान्य माणूस सोसत असताना आता वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य वीज नियामक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
किती युनिटसाठी किती वीज दरवाढ?
आर्थिक वर्ष 2023 ते 24 साठी बेस्टने एमईआरसीकडे (महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग) वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. 18 टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याने मुंबईकरांच्या वीज बिलामध्ये 18 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.