महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात हिंदू सण उत्सवांवर कठोर निर्बंध आले होते. कोरोना निर्बंधांच्या नावाखाली गणपती आणि नवरात्र उत्सवांवर निर्बंध लादायचे आणि दुसऱ्या बाजूला विशिष्ट धर्मियांना त्यांच्या कार्यक्रमांसाठी परवानगी द्यायची असे प्रकार राजरोसपणे ठाकरे सरकारच्या काळात सुरु होते. मात्र, आता महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आलं असून मुंबईत दहीहंडी आणि गणपतीच्या पाठोपाठ नवरात्रोत्सवही जल्लोषात साजरा होणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी दिली.
रविवार, २५ सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या तयारीबाबत आणि आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी मुंबई भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध गीतकार संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
अभ्युदय नगर येथे होणार उत्सव
मिहीर कोटेचा म्हणाले की, ‘दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या नंतर आता मुंबई भाजपकडून नवरात्रोत्सवाचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. शिवडीच्या अभ्युदय नगरमधील शहीद भगतसिंह मैदानावर हा उत्सव आयोजित करण्यात आला असून, मुंबईतील सर्वात मोठा उत्सव म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाईल, अशी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. हा कार्यक्रम 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत होणार आहे.
रात्री 12 पर्यंत परवानगीची अपेक्षा
आम्हाला आशा आहे की शेवटच्या 2 दिवसांत सरकार 12 पर्यंत उत्सवासाठी परवानगी देईल. 1 ऑक्टोबर रोजी वैशाली सामंत तसेच यानंतर अनेक कलाकार उपस्थित राहतील. प्रत्येक व्यक्तीला पास घेऊन प्रवेश मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी जांबोरी मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स आणि अभ्युदय नगर या तीन जागांचा विचार करण्यात आला होता. मात्र, अखेरीस अभ्युदय नगरचा पर्याय भाजपने स्वीकारला आहे, असे मिहीर कोटेचा यावेळी म्हणाले.
मराठी दांडिया
मुंबईत मराठी दांडियाचे आयोजन होत असल्याचा मला आनंद आहे. या कार्यक्रमात मला सलग गायला मिळणार आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असून त्यासाठी मी भाजपचे खूप आभार मानतो. या कार्यक्रमात मी भोंडला हा गरब्यातील मराठी गीतप्रकार गाणार आहे. या कार्यक्रमात मराठी गीतांना अधिक प्राधान्य दिले जाईल, असे गायक अवधूत गुप्ते यांनी यावेळी सांगितले.
Join Our WhatsApp Community