खड्ड्यांमुळे प्रशासन आले शुद्धीवर, आता घेतला ‘हा’ निर्णय!

खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत ९ हजार १२६ खड्डे बुजविण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

84

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे शोधण्याऐवजी आता मुंबईकरांना खड्ड्यांतील रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये ३३ हजार खड्डे बुजवल्याचा दावा केल्यानंतर मुंबईकरांची खड्ड्यांची समस्या काही कमी झालेली नव्हती. परंतु आता या खड्ड्यांमुळे नाकी तोंडी आपटण्याची वेळ आल्यानंतर महापालिका प्रशासन शुध्दीवर आले असून त्यांनी सर्व २४ प्रशासकीय विभागनिहाय संयुक्त पथकांची नेमणूक केली आहे. यामध्ये रस्ते विभाग आणि विभाग कार्यालये ही खड्डे बुजवण्याच्या कामांमध्ये समन्वय साधून काम करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी संयुक्त पथकांची नेमणूक 

डांबराचे रस्ते (अस्फाल्ट रोड) मध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे ही नित्य प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेता, खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी टप्प्याटप्प्याने रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्ड्यांचा प्रादुर्भाव कमी होणार आहे. परंतु रस्त्यांवर सद्यस्थितीत दिसून येत असलेले खड्डे त्वरित बुजविण्याची कार्यवाही महानगरपालिकेकडून करण्यात येत असते. असे असले तरी सामान्य नागरिकाकडून काही प्रसंगी खड्ड्यांबाबत नाराजी व्यक्त केली जाते. ही बाब लक्षात घेता, रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कार्यवाहीमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेतर्फे सर्व २४ प्रशासकीय विभागानुसार संयुक्त पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके विभाग कार्यालयासोबत खड्डे बुजविण्याच्या कामासाठी योग्य समन्वय साधतील. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कार्यवाहीला आणखी वेग येवून ती सुलभतेने पार पडण्यास मदत होणार आहे.

(हेही वाचा : दादरमध्ये ‘सदा’ पुढे आव्हान आदित्यचे!)

तीन दिवसांमध्ये बुजवले १७५६ रस्ते

मुंबईमध्ये ९ एप्रिल ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत एकूण ३१ हजार ३९८ खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाने केला होता, तर आता ९ एप्रिल ते ११ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये मुंबईतील रस्त्यांवरील एकूण ३३ हजार १५६ खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यासाठी वरळी स्थित धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) येथे निर्मित केलेले सुमारे २७५० मेट्रिक टन कोल्डमिक्स २४ विभाग कार्यालयात वितरित करण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. ८ सप्टेंबरपर्यंत २ हजार ६८६ मेट्रीक टन कोल्डमिक्स वितरीत करण्यात आले होते. त्यामुळे तीन दिवसांमध्ये ६४ मेट्रीक टन कोल्डमिक्स वितरीत करण्यात आले आहे. ११ सप्टेंबर पर्यंत विभाग कार्यालयातील उपलब्ध कामगारांमार्फत २४ हजार ०३० खड्डे बुजविण्यात आलेले आहेत. तर, खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत ९ हजार १२६ खड्डे बुजविण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.