Mumbai Cement Concrete Road : अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी रस्ते कंत्राटदारांविरोधात उचलले कडक पाऊल, म्हणाले… 

1031
Mumbai Cement Concrete Road : अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी रस्ते कंत्राटदारांविरोधात उचलले कडक पाऊल, म्हणाले... 
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदारांनी ३१ मे २०२४ पूर्वी पूर्ण करावीत. तसेच ७ जून २०२४ पूर्वी हे रस्ते पूर्णपणे वाहतूकयोग्य झालेच पाहिजे, असे महापालिकेने बजावले आहे. अन्यथा अशा दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून संबंधित रस्त्याचे काम काढून घ्यावे आणि अन्य दुसरा कंत्राटदार नेमून अर्धवट कामे पूर्ण करावीत. तसेच, या कामांचा खर्च मूळ कंत्राटदाराकडून वसूल करावा आणि त्याला दंडदेखील आकारावा, असे सक्त निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी देत कडक पाऊल उचलले आहे. (Mumbai Cement Concrete Road)
रस्ते कामांच्या प्रगतीचा प्रत्यक्ष आढावा
मुंबईत ठिकठिकाणी रस्ते बांधणी व दुरुस्ती आदी कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. याअनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी रस्ते कामांच्या प्रगतीचा काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाहणीतून आढावा घेतला होता. पावसाळा सुरु होण्यापूर्वी रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करावीत, रस्ते वाहतूकयोग्य करावेत, पावसाळ्यात कोणत्याही रस्त्याचे काम सुरु ठेवून नागरिकांची गैरसोय करु नये, असे निर्देश गगराणी यांनी दिले होते. (Mumbai Cement Concrete Road)
महानगरपालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) बांगर यांनी ठिकठिकाणी रस्ते कामांची पाहणी केली. आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील रस्त्यांच्या कामांची नुकतीच पाहणी करून  बांगर यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी संबंधितांना विविध निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, सहायक आयुक्त (आर मध्य) संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता (रस्ते) मनीष पटेल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Mumbai Cement Concrete Road)
रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी…
पाहणी दौऱ्यादरम्यान बांगर म्हणाले की, रस्ते कामाशी संबंधित असलेल्या विविध विभागांनी आपापसात योग्य समन्वय ठेवून वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने कामे होण्याकडे लक्ष द्यावे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, विशेषतः अपूर्ण रस्ते कामांमुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये, यादृष्टीने सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी २८ मे २०२४ रोजी रस्ते कामांचे मूल्यमापन करावे. ज्या रस्त्यांच्या कामांची प्रगती समाधानकारक आढळून येणार नाही, त्याच्याशी संबंधित कंत्राटदारांना नोटीस जारी करावी. (Mumbai Cement Concrete Road)
खर्च व दंड तत्काळ वसूल करा
तसेच दिनांक ३१ मे २०२४ पर्यंत रस्त्याची कामे पूर्ण न केल्यास आणि दिनांक ७ जून २०२४ पर्यंत रस्ते वाहतूक योग्य स्थितीत न आणल्यास त्यांच्याकडून ते काम काढून घ्यावे. त्याचप्रमाणे संबंधित काम अन्य कंत्राटदाराकडून पूर्ण करून घ्यावे. या कामाचा संपूर्ण खर्च मूळ नियुक्त कंत्राटदाराकडून वसूल करावा. तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाई देखील करावी, खर्च व दंड तत्काळ वसूल करावा, असे निर्देश बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही कार्य पद्धती मुंबईत सुरू असलेल्या सर्व रस्ते कामांसाठी लागू असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Mumbai Cement Concrete Road)
राडारोडा तात्काळ उचला…
दरम्यान, पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे आढळता कामा नये. त्यामुळे, दिसेल तो खड्डा तात्काळ बुजवावा तसेच रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडा तात्काळ उचलून घ्यावा, अशा सूचनाही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्या. (Mumbai Cement Concrete Road)
हेही पहा  – https://www.youtube.com/watch?v=6Dp9iR9I9ys
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.