कोस्टलच्या भुयारी मार्गात ‘मावळा’ लढतोय… जोरात मार्गक्रमण सुरू

अशाचप्रकारे मावळा मार्गक्रमण करत पुढे सरकत राहिल्यास, कोस्टलच्या बोगद्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे महापालिकेचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मुंबई सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणा-या महाबोगद्याचे खोदकाम ‘मावळा’ या अवाढव्य संयंत्राद्वारे अव्याहतपणे सुरू आहे. बुधवारी रात्री या ३३० मीटर बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले. २ मार्च रोजी बोगद्याच्या कामाची शतकपूर्ती करणाऱ्या मावळ्याने, ५७ ते ५८ दिवसांमध्ये तीनशे मीटरच्या पलिकडे जात मार्गक्रमण केले आहे. अशाचप्रकारे मावळा मार्गक्रमण करत पुढे सरकत राहिल्यास, कोस्टलच्या बोगद्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे महापालिकेचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मावळ्याचे पाऊल पडते पुढे

सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खणण्यासाठी ‘मावळा’ यंत्र कार्यान्वित करण्याचा शुभारंभ, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ११ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आला होता. तेव्हापासून बोगदे खणण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. पहिल्या १०० मीटरच्या खोदकामाचा पल्ला मावळ्याने ५० ते ५१ दिवसांनी गाठला होता. पण पुढील २३० मीटरचा पल्ला केवळ ५७ ते ५८ दिवसांमध्ये गाठला आहे. त्यामुळे ‘मावळा’ दुप्पट गती वाढवून भुयारी मार्गातून पुढे मार्गक्रमण करत आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे एक पाऊल पुढे, असे म्हणत महापालिकेने टीबीएम ‘मावळा’च्या सहाय्याने ३३० मीटरचे खोदकाम पूर्ण झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या प्रकल्पाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

(हेही वाचाः 176 खांबांवर कोस्टल रोडच्या पुलाचा भार!)

काय आहे ‘मावळा’चा उपयोग?

सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली आहे. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत(मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत असणार आहेत. हे बोगदे ‘मलबार हिल’च्या खालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे. बोगदे खणण्यासाठी १२.१९ मीटर व्यास असणारे भव्य असे ‘टनेल बोरिंग मशीन’ वापरण्यात येणार असून, या संयंत्राचे ‘मावळा’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे संयंत्र ४ मजली इमारती एवढे उंच असून त्याची लांबी ही तब्बल ८० मीटर एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here