स्वच्छतेच्या दैनंदिन कामकाजामध्ये कुचराई केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल दिली आहे. मुंबईतील सर्व प्रमुख परिसर व रस्त्यांप्रमाणेच इतर सर्व लहान-सहान रस्ते आणि गल्लीबोळामध्येही स्वच्छतेची कार्यवाही झाली पाहिजे. त्यासाठी सर्व सहआयुक्त, उपआयुक्त, विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी दररोज सकाळ सत्रात एक तास व सायंकाळ सत्रात एक तास याप्रमाणे एकूण दोन तास प्रत्यक्ष विभागांत भेटी द्याव्यात. तसेच स्वच्छतेची कार्यवाही नियमितपणे होईल, याची दक्षता घ्यावी असे सक्त निर्देशही चहल यांनी दिले आहेत.
मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता तसेच अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज यावरील कारवाई संदर्भात आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त चहल यांनी शुक्रवारी १ सप्टेंबर २०२३ रोजी यांनी तातडीने बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, संबंधित इतर अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत संबोधित करताना महानगरपालिका आयुक्त चहल यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरातील काही परिसरांमध्ये भेटी देऊन परिसर स्वच्छतेची पाहणी केली. या पाहणीनंतर मुख्यमंत्री महोदयांनी वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत. प्रमुख परिसर व रस्त्यांप्रमाणेच इतरही सर्व लहानसहान परिसर, रस्ते, गल्ली आदी ठिकाणी देखील स्वच्छतेची कामे दररोज योग्यरितीने होणे आवश्यक आहे. मुंबईत कुठेही रस्त्यावर कचरा दिसता कामा नये. याची काळजी घ्या. राडारोडा आणि कचरा त्वरीत हटवा. महानगरपालिकेचे सर्व सहायक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कर्मचारी इत्यादी सर्व यंत्रणा तत्परतेने कार्यरत ठेवा. मुंबईकर नागरिकांना स्वच्छतेचा अनुभव सगळीकडे आला पाहिजे.
(हेही वाचा – I.N.D.I.A. Alliance : ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी….!)
मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनांचे पालन करण्याच्या दृष्टीने आयुक्त चहल यांनी विविध निर्देश दिले. स्वच्छतेच्या दैनंदिन कामांवर देखरेख करण्याच्या दृष्टीने सर्व परिमंडळाचे सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांच्या सहायक आयुक्तांनी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व संबंधित अधिकारी, अभियंता यांनी दररोज सकाळ सत्रात एक तास व सायंकाळ सत्रात एक तास असे किमान दोन तास प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी द्याव्यात. वेगवेगळ्या परिसरांमध्ये जावून स्वच्छतेची कार्यवाही होते आहे, याची खातरजमा करावी. आवश्यकता असल्यास परिसरनिहाय पथक गठीत करुन कार्यवाही करा, त्याचप्रमाणे सार्वजनिक प्रसाधनगृहांची दिवसातून किमान दोन वेळा नियमित स्वच्छता होईल, असे पाहावे, अशा सूचना चहल यांनी केल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community