माहितीच्या अधिकाराचा वापर करुन मागत होता खंडणी! आरटीआय कार्यकर्ता गजाआड

याप्रकरणी त्याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

120

सरकारने दिलेल्या माहितीच्या अधिकाराला (आरटीआय) काही जणांनी पैसे कमावण्याचे साधन बनवले आहे. अशाच एका ६२ वर्षीय आरटीआय कार्यकर्त्याला गुन्हे शाखेने दहा लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणी अटक केली आहे. या आरटीआय कार्यकर्त्याने सार्वजनिक बांधकाम विभागात माहितीच्या अधिकारासाठी अर्ज दाखल करुन, तो अर्ज मागे घेण्यासाठी एका कंत्राटदाराकडे चक्क १० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

कंत्राटदाराला दिली धमकी

रमेश धनमल शहा असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. रमेशने अंधेरी तीन डोंगरी पोलिस वसाहत या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाबाबत शंका उपस्थित करुन, कंत्राटदार कंपनीच्या सुपरवायझरला २०१९ मध्ये धमकी दिली व काम बंद करण्यास सांगितले. कामाचा दर्जा निकृष्ट असून, याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देऊन रमेशने बांधकाम साईटवरील फोटोग्राफ काढले होते.

(हेही वाचाः वानखेडेंवर आरोप करणारे नवाब मलिक एकटे पडले का?)

केली १० लाखांची मागणी

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात माहितीच्या अधिकाराचा अर्ज करुन, कामासंदर्भात माहिती मागवली होती. हा अर्ज माघारी घेण्यासाठी रमेश शहा कंत्राटदाराकडे १० लाखांची मागणी करत होता. याप्रकरणी कंत्राटदाराने गुन्हे शाखा कक्ष-९ या ठिकाणी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने १६ ऑक्टोबर रोजी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. दरम्यान पोलिसांनी संगितल्यानुसार, कंत्राटदाराने रमेश शहाला खंडणीची रक्कम घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंधेरी या ठिकाणी २० ऑक्टोबर रोजी येण्यास सांगितले होते.

सापळा रचून केली अटक

गुन्हे शाखा कक्ष-९चे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण आहेर, सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र पाटील, घाडगे आणि पथक यांनी सापळा रचून खंडणीची रक्कम स्वीकारताना रमेश शहा या आरटीआय कार्यकर्त्याला मुद्देमालासह अटक केली. याप्रकरणी त्याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचाः वन अविघ्न पार्क अग्नितांडवः मॉक ड्रील होऊनही उडाला गोंधळ! चूक कोणाची?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.