लालबागमधील श्रॉफ बिल्डिंगच्या समोर असणाऱ्या इब्राहिम कासम चाळीत मंगळवारी रात्री धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चाळीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील कपाटात ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह तुकडे केलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृत महिलेची २३ वर्षाची मुलगी मागील तीन महिन्यांपासून मृतदेहासोबत राहत होती. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण लालबाग परिसर हादरला असून पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून मुलीला ताब्यात घेतले घेतले आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना घटनास्थळी मार्बल कटर, एक कोयता आणि सुरा सापडला आहे. मुलीने आईची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी २३ वर्षीय मुलीच्या विरोधात हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.
( हेही वाचा :महाविकास आघाडी राज्यभर सभा घेणार, काय आहे योजना? )
वीणा प्रकाश जैन (५५) असे मृत महिलेचे नाव असून रिम्पल (२३) असे मुलीचे नाव आहे. या दोघी मायलेकी चिंचपोकळी लालबाग जंक्शन, येथील इब्राहिम कासम चाळीतील पहिल्या मजल्यावर राहत होत्या. वीणा यांच्या पतीचा १६ वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून त्यांचे इतर नातेवाईक जवळच असलेल्या गुंडेचा गार्डन येथे राहतात. या मायलेकींचा खर्च वीणा यांचा भाऊ करत होता, रिम्पल हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून, त्यानंतर पुढे तिने शिक्षण घेतले नाही.
वीणासोबत मागील तीन महिन्यांपासून बोलणे होत नसल्यामुळे भाऊ सुरेश पोरवाल यांनी भाची रिम्पल हिच्याकडे चौकशी केली असता ती नेहमी आई वीणाबाबत बोलण्यास टाळत होती. मंगळवारी सायंकाळी रिम्पलची चुलती भेटायला घरी आली तेव्हा, रिम्पलने दार उघडून आई घरात नाही असे बोलून पुन्हा दार बंद करून घेतले, त्यानंतर सुरेश पोरवाल हे घरी आले, मात्र रिम्पल दार उघडत नसल्याचे बघून तिच्या चुलत भावाला बोलवण्यात आले.
भावाने रिम्पलला दार उघडायला लावला व आत जाऊन तिच्याकडे आई वीणा कुठे गेली याबाबत चौकशी केली असता आई कानपुरला गेली एवढे बोलून ती गप्प राहिली. नातलगांना संशय येताच नातलग तिला घेऊन काळाचौकी पोलीस ठाण्यात वीणा जैन हरविल्या बाबत तक्रार करण्यासाठी आले. रिम्पल हिने महिनाभर आंघोळ न केल्यामुळे तिच्या अंगाचा कुबट वास येत होता, व ती सांगत असलेली माहिती संशयास्पद वाटू लागल्यामुळे पोलीस तिला घेऊन नातलगांसह इब्राहिम कासम चाळीत आले.
वीणा जैन यांच्या घरात येताच संपूर्ण घरात पसारा आणि कुबट वास येत होता, पोलिसांनी घरातील कपाट उघडताच कपाटातून कुजलेला वास बाहेर आला आणि कपाटातून प्लास्टिकची मोठी पिशवी बाहेर पडली. पोलिसांनी पिशवी तपासली असता त्यात मृतदेहाचे तुकडे कुजलेल्या अवस्थेत सापडले. हा सर्व प्रकार बघून पोलिसांना धक्का बसला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो केईएम शवविच्छेदन विभागाकडे पाठविण्यात आला, हा मृतदेह वीणा जैन हिचा असल्याचे समोर आले.
पोलिसांनी याबाबत रिम्पलकडे चौकशी केली मात्र ती काहीही सांगण्याचा मनस्थितीत नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वीणा हिची हत्या २७ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली असावी, हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे पाच तुकडे करून हे तुकडे प्लास्टिक पिशवीत गुंडाळून ही प्लस्टिक बॅग घरातील लोखंडी कपाटात ठेवण्यात आली होती. रिम्पल ही मागील तीन महिन्यापासून आईच्या मृतदेहासोबत घर बंद करून राहत होती आणि वडापाव, समोसा असे पदार्थ घरीच आणून खात होती. तिने एक महिन्यापासून आंघोळ केली नसल्यामुळे शरीराचा कुबट वास येत होता अशी माहिती काळाचौकी पोलिसांनी दिली.
काळाचौकी पोलिसांनी प्राथमिक तपसावरून हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आणि भारतीय शस्त्र अधिनियम कायदा अंतर्गत मुलगी रिम्पल हिच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. रिम्पलने एकटीनेच आईची हत्या करून मृतदेहाचे पाच तुकडे करून मृतदेह लपवून ठेवला यावर पोलिसांना विश्वास बसत नसून तिच्या सोबत आणखी कोणी या कृत्यात सहभागी आहे का? याचा तपास काळाचौकी पोलीस करीत आहे.