बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने राबविण्यात येत असलेल्या सखोल स्वच्छता मोहीम अर्थात डीप क्लीन ड्राईव्ह (Deep clean drive) अंतर्गत महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये शनिवारी १० फेब्रुवारी २०२४ एकाच वेळी सार्वजनिक स्वच्छतेचा जागर करण्यात आला. विशेषतः दाटीवाटीच्या, अरुंद व झोपडपट्टी परिसरांमध्ये अंतर्गत रस्ते, पदपथ, दुभाजक, लहानसहान गल्लीबोळ यांची स्वच्छता करण्यात आली. यात, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी अंधेरी ते गोरेगाव परिसरातील मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन हाती पाण्याचा पाईप घेऊन झोपडपट्टयांमधील वस्त्या पाण्याने धुतल्या. (Mumbai Deep Cleaning)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या निर्देशानुसार, स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्रत्येक प्रशासकीय विभागात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणे सात परिमंडळांमध्ये मिळून एकूण सात प्रशासकीय विभागांमध्ये ही मोहीम राबवली जात होती. त्या कार्यपद्धतीनुसार सर्व प्रशासकीय विभागांचा क्रम पूर्ण झाला. स्वच्छता ही निरंतर प्रक्रिया असल्याने त्यात सातत्य राखायला हवे, या भूमिकेतून महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या निर्देशानुसार, आता यापुढे दर शनिवारी सर्व २४ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज करण्यात आलेल्या कार्यवाहीस सर्वत्र स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (Mumbai Deep Cleaning)
रस्ते, पदपथ, लहान-सहान गल्लीबोळांमध्ये असलेला घनकचरा तसेच टाकाऊ वस्तू पूर्णपणे काढणे, तसेच ब्रशिंग करुन रस्ते, पदपथांवरील धूळ काढणे, त्यानंतर पाण्याने धुणे ही सर्व कार्यवाही करतानाच रस्त्यांवर उगवलेली खुरटी झाडीझुडपे समूळ काढणे, अवैध जाहिरात फलक हटविणे, कीटकनाशक धूर फवारणी, पावसाळी जाळ्या- गटारे व नाले यांची स्वच्छता, धोकादायक तारांचे जंजाळ काढणे आदी विविध कामे सखोल स्वच्छता मोहिमेतून करण्यात येत आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी शनिवारी सकाळी ८ वाजेपासून केलेल्या दोऱ्यात या सर्व कार्यवाहीची पाहणी करतानाच स्वतः सखोल स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग देखील घेतला. यावेळी उप आयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे यांच्यासह के पूर्वचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, पी दक्षिणचे सहायक आयुक्त संजय जाधव आणि इतर संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. (Mumbai Deep Cleaning)
(हेही वाचा – Maharashtra State Hindi Sahitya Academy: वीर सावरकर यांच्या पत्रकारितेतून शिकण्याची गरज : स्वप्निल सावरकर)
यामुळे दैनंदिन स्वच्छतेमध्ये अडथळा
यामध्ये प्रामुख्याने आयुक्तांनी के पूर्व विभागाच्या हद्दीत अंधेरी पूर्व परिसरात जमनालाल बजाज नगर त्याचप्रमाणे पी दक्षिण विभागातील गोरेगाव पश्चिम भागात विठ्ठलपाडा परिसरात अंतर्गत रस्ते, गल्लीबोळात जावून स्वच्छता केली. मोहिमेसाठी आलेल्या स्थानिक रहिवाशांशी तसेच शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व चहल यांनी अधोरेखित केले. स्वच्छता कशा प्रकारे करणे अपेक्षित आहे, याचे प्रात्यक्षिक देखील त्यांनी नागरिकांना करुन दाखवले. स्थानिक लोकप्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. अंधेरी पूर्व येथील जमनालाल बजाज नगरामध्ये स्वच्छता मोहिमेप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल (Iqbal Singh Chahal) यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून स्वच्छतेचा जागर करावा. शालेय परिसरात स्वच्छता उपक्रम राबवावेत तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष स्वच्छतेची कृती करावी, स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात, विद्यार्थी हे देशाचे भविष्य असल्याने त्यांचा सहभाग सर्वाधिक मोलाचा आहे, असे आयुक्त महोदयांनी नमूद केले. (Mumbai Deep Cleaning)
के पूर्व विभागात स्वामी विवेकानंद मार्गावर ओमनगर येथे पदपथ व रस्त्यांच्या कडेला पाणी फवारणी करत असताना रस्त्याच्या दुतर्फा कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे तसेच दुचाकींमुळे कचरा काढण्याला त्याचप्रमाणे स्वच्छतेला अडसर निर्माण होत असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त महोदयांनी मुंबई वाहतूक शाखेचे सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांच्याशी थेट तेथूनच दूरध्वनीवरून संपर्क साधला. संपूर्ण मुंबईत अंतर्गत रस्त्यांवर व इतरत्र देखील रस्त्यांच्या बाजूला खूप दिवसांपासून उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे दैनंदिन स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्याचा वाहतुकीलाही त्रास होतो. ही बाब वारंवार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यापुढे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी समन्वय साधून ही वाहने हटवण्याची कार्यवाही वेगाने करावी. विभाग पातळीवरील तसेच मुख्यालयातील स्वच्छता मोहिमेच्या बैठकांमध्ये वाहतूक पोलिस विभागांच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, जेणेकरुन या अडचणींचे निराकरण करता येईल, असे निर्देश आयुक्तांनी दिले. पी दक्षिण विभागातील गोरेगाव पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, सुंदर नगर जंक्शन, खंडू भंडारी चौक, विठ्ठलपाडा परिसरांमध्ये स्वच्छता मोहिमेत आयुक्त प्रत्यक्ष सहभागी झाले. विठ्ठलपाडा येथील अरुंद वसाहतीत लहानसहान गल्लीबोळांमध्ये शिरुन आयुक्तांनी स्वच्छता केली. पाणी फवारणी करत गल्ली स्वच्छ केली. (Mumbai Deep Cleaning)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community