‘बेस्ट’चा महत्वपूर्ण निर्णय! मुंबईकर करणार प्रदूषणमुक्त प्रवास

123

देशभरातील प्रदूषणाच्या आकड्यात गेल्या दोन ते तीन वर्षात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आता महत्वाच्या शहरातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सरकराने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ‘मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्ष’चा शुभारंभ केला. यामुळे लवकरच आता बेस्टचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार असून, बेस्टच्या ताफ्यातील सर्व बसेस इलेक्ट्रिक होणार आहेत.

( हेही वाचा : भ्रष्टाचाराचा कळस! ‘बेस्ट’ने कर्मचाऱ्यांना दिलेल्या सेफ्टी बुटाचेही काही महिन्यांतच तुकडे )

‘मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्ष’

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेला ‘मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्ष’ हे क्रांतिकारक पाऊल असून या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी मदत होईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही केवळ मोहीम न राहता ती सवय बनणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी सुरूवातीला सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले. आता शासकीय पातळीवर इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे वैयक्तिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी चार्जिंग स्थानके वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. मुंबईसह राज्यात लवकरच मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहने धावू लागतील आणि वाहनांद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यात आपण आघाडीचे राज्य बनू असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील 

सार्वजनिक वाहतुकीअंतर्गत मुंबईत बेस्टच्या ताफ्यात सध्या असलेल्या 386 बसेसमध्ये लवकरच वाढ होऊन 2027 पूर्वी 100 टक्के बसेस इलेक्ट्रिक असतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक वाहनांची माहिती देऊन 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात खरेदी करण्यात येणाऱ्या संपूर्ण बसेस इलेक्ट्रिक असतील असे नियोजन असल्याचे सांगितले.

यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईचे उपमहापौर ॲड सुहास वाडकर, स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.संजीवकुमार, उपायुक्त (पर्यावरण) सुनील गोडसे, डब्ल्यूआरआय इंडियाच्या सिटीज प्रोग्रामचे कार्यकारी संचालक माधव पै, नागरी विकास उपक्रम प्रमुख लुबायना रंगवाला, इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक चैतन्या कानुरी, सल्लागार कौस्तुभ गोसावी, पर्यावरण सल्लागार तन्मय टकले आदी उपस्थित होते. वर्ल्ड रिसोर्सेस इंडिया (डब्ल्यूआरआय) संस्थेच्या सहकार्याने ‘मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्ष’ याची स्थापना करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.