मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात लवकरच जीव शोधक यंत्र

नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या व्यक्तीचे ठिकाण अचूकपणे कळून त्यांचा बचाव लवकरात लवकर होईल.

104

घर पडल्याच्या वर्दीवर, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी, भूकंप झाल्यास तसेच छोट्या जागी व इतर अत्यावश्यक प्रसंगी अडकलेल्या व्यक्तींची सुटका व विमोचन कार्यादरम्यान अडकलेल्या व्यक्तीचा ठिकाण शोध घेण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने वापरण्यात येणारे सर्च कॅमेरा आता नादुरुस्त झाले आहे. मागील दहा वर्षांपूर्वी खरेदी केलेले सर्च कॅमेराचा नादुरुस्त झाल्याने अखेर महापालिकेने डिझास्टर डिप्लॉयमेंट किट अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारीत सर्च कॅमेरा असलेल्या जीव शोधक यंत्र हे खरेदी केले जात आहे.

मुंबईतील जनतेच्या जीविताचे व संपत्तीचे आगीपासून व इतर दुघर्टनेपासून संरक्षण करण्याचे बंधनकारक कर्तव्य अग्निशमन दलामार्फत पार पाडले जाते. दरवर्षी जवळपास १७ हजार आपत्कालिन वर्द्यांना अग्निशमन दलामार्फत प्रतिसाद दिला जातो. यामध्ये आग लागणे, अपघात, झाड पडणे, बुडणे, रसायनांची गळती, तेल सांडणे, घर कोसळणे इत्यार्दी दुघर्टनांचा समावेश असतो. मागील ५ वर्षांमध्ये घर पडल्याच्या एकूण १४७६ दुघर्टनांना अग्निशमन दलाने प्रतिसाद दिला असून यामध्ये ४४४ व्यक्ती जखमी झाल्या व १५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

घर पडल्याच्या वर्दीवर, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी, भूकंप झाल्यास तसेच छोट्या जागी व इतर अत्यावश्यक प्रसंगी अडकलेल्या व्यक्तींची सुटका व विमोचन कार्यादरम्यान अग्निशमन दलाचे जवान, अडकलेल्या व्यक्तीचा ठिकाण शोध घेण्यासाठी सर्च कॅमेरांचा वापर करतात. हे कॅमेरे १० वर्ष जुनी व त्या काळाच्या तंत्रज्ञानावर आधारीत असून त्या वारंवार नादुरुस्त होत असल्याने महापालिकेच्यावतीने नव्याने सर्च कॅमेरांचा अंतर्भाव असलेल्या यंत्रांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीसाठी जमिनीच्या आरक्षणात फेरबदल)

सध्याच्या सर्च कॅमेरांमुळे ढिगाऱ्याचा प्रकार व त्याचा आकारमान, पावसाळी वातावरण तसेच अडकलेल्या व्यक्तीची स्थिती या अशा इतर अनेक घटकांमुळे मर्यादा येतात. त्यामुळे अग्निशमन दलाला अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत यंत्राची आवश्यकता भासू लागली आहे. जेणेकरून अडकलेल्या व्यक्तींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांचा जीव वाचवणे शक्य होईल,असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जून २०२२ मध्ये कुर्ला येथे घडलेल्या इमारत कोसळण्याच्या दुघर्टनेत बचाव कार्यालयादरम्यान अशा यंत्राची आवश्यकता भासली होती, ज्यामध्ये मोठी जिवित हानी झाली होती.

यंत्र वाहून नेण्यास सोपे

सध्या बाजारात डिझास्टर डीप्लॉयमेंट किट उपलब्ध असून यामध्ये जीव शोधक यंत्र व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत सर्च कॅमेराचा समावेश आहे. या दोन्ही उपकरणांच्या एकत्रित वापरामुळे अडकलेल्या व्यक्तीचे ठिकाण अचूकपणे कळून त्यांना बचाव कार्य लवकरात लवकर होईल. तसेच हे यंत्र वाहून नेण्यास सोपे असून घर पडल्याच्या वर्दीवर प्रथम प्रतिसादात्मक वाहनासोबत पाठवून त्याचा प्रारंभीच्या अवस्थेत वापर होऊ शकतो,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या १५ यंत्रांची खरेदी केली जाणार आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये ८ कोटी ११ लाख रुपयांमध्ये ही १५ यंत्र खरेदी करण्यासाठी पात्र कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी युनी केअर इमर्जन्सी ईक्वीपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून ही यंत्रे खरेदी केली जाणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.