मुंबई हाय कोल्यांची… नाही कुणाच्या बापाची… या घोषणांनी मुंबापुरी कोळी बांधवांनी दणाणून सोडली. कोळी भगिनींवर होत असलेल्या अन्यायाविरोधातील जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून कोळी बांधवांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून देत आम्हाला हद्पार करण्याचा प्रयत्न करू नका, नाही तर आमच्याशी गाठ आहे, असाच इशारा महापालिकेला दिला. आमच्या हक्काचा हुसकावलेल्या जमिनी आणि मासळी मंडई आम्हाला परत द्या. जर शासनाने आणि प्रशासनाने आमच्या मागण्यांची दाखल दहा दिवसात घेतली नाही, तर पंधराव्या दिवशी उग्र आंदोलन करून झोपलेल्या सरकारला दणका देण्यात येणार असल्याचाही इशारा कोळी बांधवांनी दिला आहे.
आझाद मैदानात धडक मोर्चा!
मच्छिमारांवर नगरपालिकेच्या सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात मच्छीमारांनी पुकारलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने मच्छिमार उपस्थित राहून जन आक्रोश व्यक्त केला. आझाद मैदानात पुकारलेल्या या धडक मोर्चामध्ये मच्छिमारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सरकार आणि महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. या मोर्चामध्ये डहाणू, सातपाटी, उत्तन, वसई, पालघर, बोईसर, रायगड, कुलाबा, माहीम, खार दांडा, वरळी, ठाणे, भांडुप, पनवेल, नवी मुंबई इत्यादी ठिकाणाहून मोठ्या संख्येने कोळी भगिनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या. महात्मा ज्योतीबा फुले मंडई अर्थात कॉफ्रर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई आणि दादर येथील मीनाताई ठाकरे मासळी मंडईतील कोळी भगिनींवरील केलेल्या षडयंत्रांच्या विरोधात मच्छिमारी बांधवांनी एकजूट दाखवून देत यापुढे अन्याय सहन केला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी त्यांनी दिला.
(हेही वाचा : कोळीवाड्यांवर कुणाची वक्रनजर?)
महापालिकेच्या प्रति नाराजी
यावेळी कोळी समाजाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका सह आयुक्त रमेश पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मच्छिमारांच्या आरक्षण पुनर्स्थापित करण्याच्या मागणीला आणि दादर येथील मासळी मंडईच्या महिलांना पुन्हा त्याच जागेवर पुनर्वसन करण्याची मागणी वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल, असे सांगितले. मच्छिमारांनी या बैठकीत नाराजी व्यक्त करत पालिकेच्या नकारात्मक मानसिकतेवर टीका व्यक्त केली. तसेच आयुक्तांनी या शिष्टमंडळाला भेट दिली नसल्याबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली. या मोर्चात समितीच्या वतीने बर्नार्ड डिमेलो, संजय कोळी, नयनाताई पाटील, ॲड. कमलाकर कांडेकर, प्रदीप टपके, विनोद पाटील, शुभांगीताई कुटे, राजश्रीताई भानजी प्रफुल भोईर, जी.एस. पाटील, दिगंबर वैती, संतोष मर्दे, विश्वनाथ सालीयान, कुंदन दवणे, सुनील बोले, सुनील कोळी, माजी नगरसेविक विलास चावरी, माजी नगरसेविका छाया भानजी आदी उपस्थित होते.
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, मच्छीमारांची एकच मागणी आहे की आमच्या हक्काचा हुसकावलेल्या जमिनी आणि मासळी मंडई आम्हाला परत दिली जावी. जर शासनाने आणि प्रशासनाने आमच्या मागण्यांची दाखल दहा दिवसात घेतली नाही तर पंधराव्या दिवशी उग्र आंदोलन करून झोपलेल्या सरकारला दणका देण्यात असल्याचे तांडेल यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community