जुलैच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील हवेची गुणवत्ता देशभराच्या तुलनेत आरोग्यदायी नोंदवली गेली. मुंबईत गुरुवारी एकाच दिवसांत बहुतांश भागांत २०० मिमी अधिक पावसाची नोंद झाल्याने हवेचा दर्जा उत्कृष्ट झाल्याची माहिती सफर या प्रणालीतून दिली गेली. मुंबईत धूलिकण आणि अतिसूक्ष्म धूलिकण हवेतून ब-यापैकी विरल्याने मुंबईतील हवा शुक्रवार सकाळपासून आल्हाददायक दिसू लागली. धूळ, मातीपासून आराम मिळाल्याने सकाळच्या वाहतूक कोंडीतही धूराचा त्रास जाणवत नव्हता.
( हेही वाचा : ‘DRDO’ ने तयार केले मानवरहित विमान )
मुंबई व नवीमुंबईतील सर्वच ठिकाणी हवेची गुणवत्ता सुधारल्याने मुंबई सफर या प्रणालीने दोन्ही शहरांतील विविध स्थानकांना हिरवा रंग देत प्रवास करण्यास कुठलाही त्रास नसल्याची माहिती दिली. वरळी, चेंबूर, अंधेरी आणि बोरिवलीत येथील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण २२ तर मालाड येथे ३२ नोंदवले गेले. संपूर्ण मुंबईची हवेची गुणवत्ता केवळ २४ वर नोंदवली गेली.
देशातील इतर स्थानकांतील हवेचा दर्जा
मुंबईसह देशभरातील इतर तीन शहरांच्या हवेच्या गुणवत्तेची माहिती सफर या प्रणालीतून दिली जाते. पुण्यात ३५, दिल्लीत ६४ तर अहमदाबाद येथे ५९ एवढी हवेची गुणवत्ता दिसून आली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा फारसा जोर दिसत नसल्याने हवेच्या गुणवत्तेत शनिवारी बदल दिसून येतील. शनिवारी मुंबईतील गुणवत्ता दुप्पटीने वाढत ५५ पर्यंत पोहोचेल, असा अंदाज सफर या प्रणालीतून दिला गेला.
Join Our WhatsApp Community